पुणे महानगरपालिकेने केवळ दोन घरांच्या स्वच्छता साहित्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांचे साहित्य खरेदी केल्याचे समोर आले

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

म.सादिक मजाहिरी

पुणे –  पुणे महानगरपालिकेने  केवळ दोन घरांच्या स्वच्छता साहित्यासाठी  तब्बल 25 लाख रुपयांचे साहित्य खरेदी केल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे, त्यातील एक घर तब्बल 10 महिन्यांपासून बंद आहे. तर, दुसऱ्या घरात महानगरपालिका आयुक्त स्वत: राहत आहेत. त्यामुळे घरांच्या स्वच्छतेसाठी नमके असे कोणते साहित्य महानगरपालिकेने खर्च केले आहे ..? हा प्रश्‍न समस्त पुणेकरांना पडला आहे. तर, ही घरांची नाही तर महानगरपालिकेची तिजोरी साफ करण्याचा प्रकार असल्याची जोरदार टीका होऊ लागली आहे.

घोले रस्ता- शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाकडे महापौर बंगला तसेच पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या स्वच्छतेचे काम पाहिले जाते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी नियमित स्वच्छता होते. यावर्षीही क्षेत्रीय कार्यालयाने या दोन्ही बंगल्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडे स्वच्छतेसाठी साहित्याची मागणी केली. त्यानुसार भांडार विभागाने ही स्वच्छता साहित्याची खरेदी केली असून ती जवळपास 25 लाखांची आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेचा महापौर बंगला 15 मार्च 2022 पासून बंद आहे. महापालिका सदस्यांची मुदत संपल्याने हा बंगला प्रशासनाने ताब्यात घेतला असून, तेथे कोणीही राहत नाही. त्यामुळे सर्व खोल्या बंद आहेत. परिणामी, या बंगल्यात केवळ झाडणकाम, फरशी पुसणे तसेच धूळ काढण्याचे काम केले जाते. त्यामुळे या बंगल्याच्या स्वच्छतेसाठी लाखोंच्या स्वच्छता साहित्याची खरंच गरज आहे का? हा प्रश्‍न आहे. त्याचवेळी आयुक्त बंगला वापरत असले, तरी त्यांच्या बंगल्यासाठीही वर्षाला 10 लाखांपेक्षा अधिक साहित्याची गरज भासू शकते का? असा प्रश्‍न आहे. त्यामुळे महापालिकेने केलेली ही स्वच्छता साहित्याची खरेदी चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post