यंदाच्या हिवाळी अधिवेशनात पुणे उणेच राहिले...आमदार चेतन तुपे



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुणे शहराच्या वेगवेगळ्या समस्या तसेच मुद्दे मांडण्यात आले. आपण स्वत: पाणी पुरवठा, समाविष्ट गावांचा मिळकतकर, 40 टक्‍क्‍यांची सवलत, बीआरटी यासह 17 मुद्दे उपस्थित करून प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला. पण राज्य सरकारकडून या प्रश्‍नांवर कोणतेही ठोस उत्तर न देता केवळ बघू एवढेच आश्‍वासन दिले. त्यामुळे, यंदाच्या हिवाळी अधिवेशनात पुणे उणेच राहिले असून राज्यातील बाळासाहेबांची शिवसेना- भाजप सरकारकडून पुणेकरांना काहीच मिळाले नसल्याची टीका हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी केली.

यावेळी तुपे यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्‍नांचा तसेच विषयांचा लेखाजोखा मांडला. हिवाळी अधिवेशनात एकूण 10 दिवस कामकाज झाले. यामध्ये माझी 100 टक्के उपस्थिती लावल्याचेही ते म्हणाले. अधिवेशनात लोकायुक्त कायदा, राज्याचा संतुलित विकास यावर आमदार तुपे यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. विशेषत: पुण्यातील महत्वाच्या प्रश्‍नांवर त्यांनी अधिवेशनात आवाज उठविला. यात कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन सव्वावर्षे उलटून गेले पण त्याला गती नाही, याच चौकात आता मेट्रो व इतर प्रकल्प आणले जाणार आहेत. त्यामुळे या चौकाचा इंटिग्रेटेड डीपीआर तयार केला पाहिजे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहतूक शहराच्या आता येऊ देऊ नये ही भूमिका मांडली. बीआरटीची सेवा बंद करावी अशी माझी भूमिका नाही. पण स्वारगेट- हडपसर मार्गावर खूप कमी बीआरटी मार्ग शिल्लक आहे. त्यातच रस्त्याच्या मध्यभागातून सायकल ट्रॅक तयार केला आहे. त्याचा काहीही उपयोग होत नाही. बीआरटीची सेवा सुधारली पाहिजे अशी भूमिका मांडली.

हडपसर विधानसभा मतदारसंघात अत्यंत कमी पाणी मिळत आहे. संपूर्ण शहरात समान पाणी पुरवठा करता यावा, यासाठी मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी घ्यावे, अशी मागणी अंतिम आठवडा प्रस्तावातून केली.

Post a Comment

Previous Post Next Post