प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : केंद्र शासनाने एक जानेवारीपासून सर्व वाहनांना एचएसआरपी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बंधनकारक केली आहे. मात्र, यासंदर्भातील आदेश शनिवार आणि रविवार विकेंडमुळे पुणे आरटीओला आलेले नाहीत.त्यामुळे वाहनांवर कारवाई होणार की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट सक्तीची केली होती. त्यानुसार नवे प्रत्येक वाहन शोरूममधून बाहेर पडले की, हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावूनच बाहेर पडत आहे. मात्र, जुन्या वाहनांना या नंबर प्लेट बंधनकारक नव्हत्या. त्या नुकत्याच केंद्र शासनाने बंधनकारक केल्या आहेत.
तर 5 ते 10 हजार रुपये दंड…
आता जुन्या वाहनांना केंद्र शासनाने हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बंधनकारक केली आहे. वाहनाला ही नंबर प्लेट नसेल, तर संबंधित वाहनचालकाला 5 ते 10 हजार पये दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी धास्ती घेतली आहे.
राज्यात हा नियम लागू होणार का..?
केंद्र शासनाने या नंबरप्लेट सक्तीच्या केल्या आहेत. तसा आदेश काढला आहे. परंतु, याबाबत महाराष्ट्र राज्यात अशी कारवाई सुरू झालेली नाही. त्यामुळे हा आदेश राज्यासह शहरात लागू होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
इतका खर्च येणार…
शनिवार आणि रविवार विकेंडमुळे यासंदर्भातील आदेश पुणे आरटीओला आले आहेत की नाही, हे अद्याप समजलेले नाही. परंतु, जर असे आदेश पुणे आरटीओला आले असतील तर पुणेकरांना आपल्या गाड्यांच्या जुन्या नंबर प्लेट बदलाव्या लागणार आहेत. दुचाकी वाहनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवायची असेल तर 356 रूपये तर चारचाकी वाहनांना 600 ते 1100 रूपयांपर्यंत खर्च येणार आहे.