प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी -चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर होऊ घातलेली पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिवसें दिवस मावळू लागली आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी या मतदारसंघाची निवडणूक लढवायचीच अशी भूमिका घेतलेली असतानाच आता आम आदमी पक्षानेही या निवडणुकीत उडी घेतली आहे.त्यातच गतवेळी अटीतटीच्या लढतीत पराभूत झालेल्या राहुल कलाटे यांनीही चाचपणी सुरू केल्यामुळे चिंचवडची निवडणूक होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी आजारापणामुळे निधन झाले. अवघ्या पंधरा दिवसांतच चिंचवडच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आमदार अथवा खासदारचे निधन झाल्यास ती जागा बिनविरोध निवडून देण्याची प्रथा महाराष्ट्रात पाळली जात होती. मात्र, भाजपने पंढपूर, कोल्हापूर आणि देगलूरची (नांदेड) निवडणूक बिनविरोध न करता त्या ठिकाणी उमेदवार देऊन या प्रथेला छेद दिला होता. त्याचेच उट्टे काढण्यासाठी विरोधी पक्षांनी चिंचवडमधील निवडणूक लढविण्याचा चंग बांधल्याचे पहावयास मिळत आहे.
लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्याच उमेदवारीवर भाजपकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. लक्ष्मण जगताप यांची पत्नी आश्विनी जगताप या इच्छुक असल्या तरी कौटुंबिक समन्वयातून शंकर जगताप यांचेच नाव निश्चित होणार हे जवळपास स्पष्ट आहे. शंकर जगताप यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केल्यामुळे भारतीय जनता पक्ष ही निवडणूक ताकदीने लढवणार हे देखील दिसून येत आहे.
या मतदारसंघातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही निवडणूक लढविण्याचा व ही जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच थेट साकडे घालत निर्णय घेण्याची विनंती केली आहे. राष्ट्रवादीकडून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, मयूर कलाटे आणि मोरेश्वर भोंडवे हे उमेदवारीचे दावेदार मानले जात आहेत. सोमवारी अथवा मंगळवारी राष्ट्रवादीची बैठक मुंबईत होणार असून, या बैठकीत निवडणूक लढविण्यावर अंतिम निर्णय होणार आहे.कॉंग्रेस, शिवसेनेकडूनही तयारी
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसनेही तयारी सुरू केली असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साकडे घातले आहे. शहराध्यक्ष कैलास कदम यांनी या मतदारसंघातील निवडणूक लढविण्याची भूमिका जाहीर केली आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही निवडणूक लढविण्याचा ठराव करत तो प्रदेशस्तरावरील नेत्यांना पाठविला आहे. या निवडणुकीत उतरण्याची तयारी शिवसेनेनेही केल्याने चुरस वाढली आहे.
पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक केवळ लढण्यावरच भर दिला नसून, पक्षाच्या चिन्हावरच उमेदवार उतरविण्याचा ठराव एकमताने संमत केला आहे. त्यामुळे कोणत्याही अपक्षाला राष्ट्रवादीची साथ असणार नाही, हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. 2009 साली चिंचवडची जागा कॉंग्रेसच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे तात्कालीन निवडणुकीत पक्षाचा उमेदवार नव्हता. तर 2014 साली या पक्षाचा उमेदवार पराभूत झाला होता. तर 2019 साली राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठींबा दिला होता. या वेळी मात्र पक्षाच्या चिन्हावरच उमेदवार उतरविण्यासाठी स्थानिक नेते आग्रही आहेत.
“आप’नेही कसली कंबर
चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही स्पष्ट झाल्यानंतर आम आदमी पार्टीनेही या मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. निवडणूक लढविण्यावर स्थानिक नेत्यांचे एकमत झाल्यानंतर त्याबाबतचे पत्र वरिष्ठ नेत्यांना पाठविले असून, ही निवडणूक लढविण्याबाबत विनंती केल्याची माहिती आपचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी दिली आहे. या निवडणुकीत “आप’ मोठ्या ताकदीनिशी निवडणूक लढवेल, असेही बेंद्रे यांनी सांगितल्याने चिंचवड विधानसभेची लढत चौरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.