प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी : ज्येष्ठ नेते, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे वय 59 होते. बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील मातब्बर नेते म्हणून लक्ष्मण भाऊंची ओळख होती. आमदार जगताप महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक होते. त्यांनी सन 2000 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर पदही भूषविले. महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.
लक्ष्मण जगताप यांनी सन 2004 मध्ये पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष निवडून येत विधानपरिषदेत प्रवेश केला. 2009 मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि पहिल्याच निवडणुकीत लक्ष्मण जगताप अपक्ष म्हणून निवडून आले.
2014 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), मनसेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविली. पण, त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी आमदार जगताप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघावर प्रथमच भाजपचा झेंडा फडकाविला. 2019 मध्येही आमदार जगताप दणदणीत मतांनी विजयी झाले.