तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे
प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी : माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाली. यामुळे भाजपमधील कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आमदार सुनील शेळके हे देखील याच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत.
जिल्ह्यातील कोणतीही विकासकामे जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर होतात. भेगडे यांच्या नियुक्तीमुळे मावळ मधील विकासाला वेग येणार की श्रेयवादाच्या लढाईत मावळचा विकास रखडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.मावळात भाजपचे वर्चस्व मोडून काढत 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील शेळके मोठ्या मतांनी निवडून आले. राज्यात मविआची सत्ता आल्याने शेळके यांना बळ मिळाले होते, परंतु त्यानंतर राज्यात सत्तांतर घडून आल्याने संजय भेगडे पुन्हा सक्रिय झाले. त्यामुळे 2019 सालापासून मावळात आजी-माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता जिल्हा नियोजन समितीमध्ये आजी-माजी आमदार असल्याने तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जिल्हा नियोजन समितीत निवड होताच माजी आमदार भेगडे यांनी विकासकामांवरून आमदार शेळके यांचे नाव न घेता आरोप केले. त्यामुळे आमदार शेळके यांनीही पलटवार करत भेगडे यांचा डाव उलटवून लावला. थेट अडविलेल्या कामांची यादीच जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे. तसेच पुढील काही दिवसांत आपली भूमिका जनतेसमोर जाहीर करु, असे भेगडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुढील काळात आजी-माजी आमदारांचे वाकयुद्ध रंगण्याची शक्यता दिसत आहे