प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे ते बंगळुरू या आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. वाळवा तालुक्यात पेठनाका ते कासेगावदरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली लहान-मोठी झाडे तोडून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुणे आणि सातारा यांना जोडणाऱ्या खंबाटकी घाटातील काम प्रगतीपथावर असून, या ठिकाणी दोन बोगदे बनवण्यात येत आहे. जे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.
खंबाटकी घाटात अनेक अपघात :
पुणे आणि सातारा यांना जोडणाऱ्या खंबाटकी घाटातील NH 48 (पूर्वी NH 4) च्या या भागामध्ये 2008 ते 2017 दरम्यान, 75 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 2015 च्या आसपास प्रथम प्रस्तावित केलेला सहा लेनचा नवीन बोगदा हा उपाय पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. खंबाटकी घाट बोगद्याचा कामसाठी सुमारे 926 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्पाची सुरुवातीला मार्च 2023 पर्यंत तयार करण्याचे नियोजित होते मात्र आता त्यासाठी पुन्हा अधिक काळ वाट पाहावी लागू शकते.
कागल-सातारा मार्गाच काम सुरू :
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दोन पॅकेजमध्ये कागल-सातारा विभागात काम सुरू केले आहे. पॅकेज १ मध्ये कागल ते पेठनाका व पॅकेज २ मध्ये पेठनाका ते शेंद्रे-सातारा असे काम होणार आहे. दोन्ही पॅकेजसाठी दोन कंपन्यांना काम देण्यात आले आहे. या सहापदरी रस्त्याचे व सेवा रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यावर अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक व्ही. डी. पंधरकर यांच्या देखरेखीखाली शेंद्रे ते पेठ नाका व पेठनाका ते कागल असे एकूण १३३ किलोमीटरचे काम होणार आहे. कागल ते पेठनाकापर्यंतचे काम जानेवारी २०२३ मध्ये सुरू करण्याचे आणि जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, पेठनाका ते शेंद्रेपर्यंतचे काम सुरू करण्यात आले आहे, ते डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे, असे केंद्रीय सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले आहे.