खासदार महाडिक यांनी आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शडडू ठोकले



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर : शासकीय चाचणी लेखापरीक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असताना गोकुळच्या आखाड्यात खासदार धनंजय महाडिक उतरले आहेत. खासदार महाडिक यांनी सध्या गोकुळचे नेतृत्व करणाऱ्या आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शडडू ठोकले आहेत. " निवडणुकीच्या काळात गोकुळची सत्ता द्या, दूध उत्पादक महिलांना सोन्याने मढवितो असा डांगोरा आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ सातत्याने पिटत होते. त्यांची गोकुळमध्ये सत्ता येऊन दीड -दोन वर्षाचा कालावधी होत आहे, आतापर्यंत त्यांनी किती दूध उत्पादक महिलांना सोन्याने मढविले हे एकदा जाहीर करावे. सध्या गोकुळचा कारभार म्हणजे गैरव्यवस्थापन आणि घोटाळे असा आहे "असे खुले आव्हान महाडिक यांनी दिले.


  पत्रकार परिषदेत बोलताना खासदार महाडिक यांनी गोकुळच्या मल्टीस्टेटवरून चेअरमन विश्वास पाटील यांच्यावर निशाणा साधला. "काँग्रेस राष्ट्रवादीचे तत्कालीन मंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याकडून गोकुळला सतत त्रास देण्याच्या प्रकारामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मल्टीस्टेट करण्याचा घाट सध्याचे चेअरमन विश्वास पाटील यांनीच घातला होता. सतैज पाटील यांच्या विरोधात मोर्चाचे नियोजन ही विश्वास पाटील यांनी केले होते. मात्र मल्टीस्टेटचे खापर आमच्यावर फोडले गेले"असा हल्लाबोल  केला. 

.
 गोकुळचे शासकीय चाचणी लेखापरीक्षण करण्याचा अधिकार सत्तेचा गैरवापर आहे असे टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी केली होती. त्या टिकेचाही खासदार महाडिक यांनीसमाचार घेतला. महाडिक म्हणाले, " आमदार सतेज पाटील यांनी मंत्रीपदावर काम करत असताना सत्तापदाचा गैरवापर करत भीमा सहकारी साखर कारखान्याचे सहा वेळा ऑडिट लावले. गोकुळच्या निवडणुकी अगोदर एका दिवसात साडेपाचशे दूध संस्थांची नियमबाह्य पद्धतीने नोंदणी केली. दूध संकलन नाही, सहकार विभागाच्या नियमांचे पालन नाही केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून या संस्थांची नोंदणी केलेली आहे. मात्र नियमबाह्य पद्धतीने केलेल्या नव्या संस्थांच्या नोंदणीमुळे वर्षांनुवर्षे ज्या त्या गावांमध्ये दूध संकलन करणाऱ्या दूध संस्थांच्यावर गंडांतर येत आहे. जुन्या दूध संस्थांच्यावर हा अन्याय आहे. नियमांना फाटा देऊन नोंदणी केलेल्या नव्या साडेपाचशे संस्थांची चौकशी लागणार आहे."असेही महाडिक यांनी सांगितले.
 "माजी मंत्री सतेज पाटील यांनी सत्तेत असताना गोकुळला त्रास देण्याचा प्रयत्न केला. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी.एन. पाटील यांनी कधी त्याचे भांडवल केले नाही. कारण कारभार हा स्वच्छ व सभासद हिताचा होता." असेही महाडिक म्हणाले. मी काम करणारा लोकप्रतिनिधी आहे. वायफळ बडबड करण्याची मला सवय नाही. कोल्हापूरच्या वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण बास्केटब्रीजच्या कामाचा शुभारंभ 29 जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे.  बास्केट ब्रिजच्या कामाला सुरुवात होत असल्याने विरोधकांना मोठी चपराक आहे. दोन वर्षांमध्ये बास्केटब्रीजचे काम पूर्ण होईल. थेट पाईपलाईन योजनेसारखे दहा वर्षे काम रखडणार नाही. किती दिवाळी झाल्या ? थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्याने किती अभ्यंगस्नान झाले?"असा सवालही महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना उद्देशून केला.

Post a Comment

Previous Post Next Post