प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर प्रेस क्लब ही कोल्हापूर शहरातील पत्रकारांची मातृसंस्था म्हणून संपूर्ण राज्यभरामध्ये ओळखली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदा २०२०आणि २०२१ या दोन वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले पत्रकार,छायाचित्रकार कॅमेरामन यांचा गौरव करण्यात येणार आहे. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून पत्रकारांच्या गौरव समारंभात खंड पडला होता. मात्र यंदा दोन्ही वर्षांचे एकत्रित पुरस्कार घोषित करण्यात आले.
२०२० सालच्या पुरस्कारा मध्ये मुद्रित माध्यमातून लोकमतचे समीर देशपांडे यांना, तसेच छायाचित्रकार म्हणून लोकमतचे आदित्य वेल्हाळ,तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दुर्वा दळवी यांना २०२० सालचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्याचबरोबर सन २०२१ साठी मुद्रित माध्यमातून पुढारीचे एकनाथ नाईक आणि लोकसत्ताचे दयानंद लिपारे यांना विभागून पुरस्कार जाहीर झाला. तसेच लोकमतचे छायाचित्रकार नसीर अत्तार तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शेखर पाटील यांना २०२१ सालचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी पासूनआरोग्यदूत स्वर्गीय रोहन जीवनराव साळुंखे यांच्या स्मरणार्थ लक्षवेधी पुरस्कार दिला जाणार आहे. यंदाचा हा पुरस्कार सकाळचे वार्ताहार सदानंद पाटील यांना घोषित करण्यात आला आहे.
कोल्हापूर प्रेस क्लबच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उपस्थित राहणार आहेत. तर स्तंभलेखक सुधींद्र कुलकर्णी यांचे सद्यस्थिती आणि पत्रकारितेसमोरील आव्हाने' या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार हसन मुश्रीफ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी सहा वाजता दसरा चौक येथील राजर्षी शाहूस्मारक भवनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांनी केले आहे.