कोल्हापूर : सहकारी व खासगी संघाच्या वतीने इंडियन डेअरी फेस्टिव्हल सुरु ..

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : सहकारी व खासगी संघाच्या वतीने शाहपुरी जिमखाना येथे उद्यापासून इंडियन डेअरी फेस्टिव्हल सुरु होत आहे. या अंतर्गत हॉटेल सयाजी येथे शुक्रवारी सकाळी 11 वाजता आयोजित आयोजित परिषदेचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू छत्रपती, केंद्रीय मंत्री नारायण राणे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती इंडियन डेरी फेस्टिवलचे निमंत्रक गोकुळचे संचालक चैतन नरके यांनी दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन व सायंकाळी साडेसात वाजता दूध परिषदेचा समारोप विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते आदित्य ठाकरे व आमदार बाळासाहेब थोरात, आमदार राजेश टोपे, आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. रविवारपर्यंत चालणाऱ्या प्रदर्शनात शंभरहून अधिक संस्थांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यातून दूध उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे.

लकी ड्रॉमध्ये बक्षीस मिळणार

दरम्यान, प्रदर्शनाला भेट देणाऱ्या दूध उत्पादक व्यावसायिकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेश करताना संबंधितांनी फॉर्म भरून द्यायचा आहे. यामधून लकी ड्रॉ काढला जाणार आहे. पहिल्या विजेत्यांना म्हैस बक्षीस देण्यात येणार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी चाफ कटर, तर तृतीय क्रमांकासाठी मिल्किंग मशीन व 10 विजेत्यांना सायलेज बॅगा देणार येणार आहेत.

कोल्हापूर शहराची निवड

काही वर्षांपूर्वी मेगा मिल्क डेअरी इव्हेंट सुरू झाल्यानंतर प्रथमच ‘इंडियन डेअरी फेस्टिव्हल-2023’ आयोजित करण्यासाठी कोल्हापूर शहराची निवड करण्यात आली आहे. हा महोत्सव 20 जानेवारीपासून तीन दिवस चालणार आहे. यात खासगी व सहकारी दूध डेअरीचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे आणि विविध डेअरी उत्पादने, यंत्रसामग्री आणि व्यवसाय योजनांचे प्रदर्शन पाहायला मिळेल.

शाहूपुरी जिमखाना मैदानात दूध उत्पादक शेतकऱ्यांपासून, दूध संस्था, दूध प्रक्रिया संघ आणि ग्राहक या सर्व घटकांना लागणारी आवश्यक माहिती, तंत्रज्ञान एकाच छताखाली मिळेल. ‘नांदी नव्या धवल क्रांतीची’ हे घोषवाक्य घेऊन आणि सद्य:स्थितीत पशुधन, डेअरी क्षेत्रातील उपलब्ध पायाभूत सुविधांच्या बळावर अधिक आणि गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन, संकलन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासह विविध विषयांवर यामध्ये चर्चा होईल.

Post a Comment

Previous Post Next Post