जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरुवात....

 ग्रामपंचायतींनी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार बाबतचे ठराव घ्यावेत

                      -जिल्हाधिकारी राहुल रेखावार


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर :  (जिमाका): मृद व जलसंधारण विभागाच्या 3 जानेवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्ह्यात जलयुक्त शिवार 2.0 हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी 26 जानेवारी 2023 रोजीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामस्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेत जलयुक्त शिवार 2.0, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजना राबविण्याबाबतचे ठराव घेऊन आपली गावे जलयुक्त करण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात आयोजित जलयुक्त शिवार अंतर्गत गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. रेखावर मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. व्ही. अजगेकर, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, भूजलचे वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी, उपविभागीय कृषी अधिकारी जी. ए.भोसले, कृषी तंत्र अधिकारी श्रीमती एस. ए. उके, पुणे येथील केंद्रीय जल भूमी बोर्डाचे अधिकारी डॉ. जे. दावीतुराज व वैज्ञानिक संदीप वाघमारे यांच्यासह अन्य समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. रेखावर पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये शासन निर्देशानुसार जी गावे समाविष्ट करावयाची आहेत त्या गावांची यादी कृषी विभागाने तात्काळ सादर करावी. अपूर्ण पाणलोट क्षेत्र असलेल्या गावांचीही यादी सादर करावी. पाणलोट क्षेत्र व पाण्याच्या ताळेबंदानुसार गावाचा आराखडा तयार करावा. त्यासाठी जलसंधारण विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

 जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची  प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जलसंधारण विभागाने 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत जलयुक्तसाठी पात्र असलेल्या गावांची यादी जाहीर करावी व पात्र ठरलेल्या गावांमध्ये 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत ग्राम समितीची स्थापना झाली पाहिजे. दि. 23 फेब्रुवारी ते 10 मार्च 2023 या कालावधीत या अभियानात समाविष्ट ग्राम स्तरावरील सर्व यंत्रणा व ग्राम समिती सदस्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावा. त्यानंतर दिनांक 15 मार्च ते 25 मार्च या कालावधीत जलयुक्तमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व गावांची शिवार फेरी आयोजित करुन परिपूर्ण आराखडे तयार करावेत. ते आराखडे तालुकास्तरीय समितीला पाठवावेत. या योजनेत समाविष्ट गावामध्ये 25 एप्रिल 2023 पासून जलयुक्त शिवारच्या कामांना सुरुवात झाली पाहिजे या पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिल्या.

    जलयुक्त शिवार मध्ये काम करणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणांनी या योजनेत प्रस्तावित केलेली सर्व कामे पावसाळ्यापूर्वी कशा पद्धतीने पूर्ण करता येतील त्याबाबतचे सूक्ष्म नियोजन करावे व कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील प्रत्येक गाव पाणीदार होण्यासाठी गावातील नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. रेखावर यांनी केले.

  प्रारंभी  समितीचे सदस्य जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. आजगेकर यांनी सन 2015-16 ते 2018- 19 या कालावधीत राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले होते व या अभियानाची फलनिष्पत्ती चांगली झाल्याने दिनांक 3 जानेवारी 2023 पासून हे अभियान राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या समितीचे सह अध्यक्ष आहेत. तर वन विभाग, कृषी विभाग, रोजगार हमी योजना, सामाजिक वनीकरण विभाग, जलसंपदा विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, भूजल संरक्षण विभाग आदी विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख हे समितीचे सदस्य असून जिल्हा जलसंधारण अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत, असेही श्री. आजगेकर यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्याचा जल आराखडा सादर

    जलशक्ती मंत्रालयाच्या अधनिस्त पुणे येथील केंद्रीय भूमिजल बोर्डाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना बोर्डाचे अधिकारी डॉ. जे. दावितुराज व वैज्ञानिक संदीप वाघमारे यांनी सादर केला. यावेळी वैज्ञानिक श्री. वाघमारे यांनी भूमी जल बोर्डाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्याचा जल व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी राबविण्यात आलेल्या पद्धतीची माहिती दिली. तसेच या आराखड्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात कशा पद्धतीने जलसंवर्धनाविषयी कामे करता येतील या बाबींची माहिती देण्यात आली आहे, असे सांगितले.

    यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जल भूमी बोर्डाच्या जल आराखड्याचे सादरीकरणाद्वारे माहिती घेतली. तसेच हा जल आराखडा जलयुक्त शिवार अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post