प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : पाचगाव रोडवर जगतापनगर येथील ऋषीकेश ऊर्फ संभा महादेव सूर्यवंशी (वय 24, रा. चंबुखडी, शिंगणापूर) याच्या खून प्रकरणी म्होरक्यासह चारही मारेकर्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण व करवीर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली. गणेश लिंगाप्पा यलगट्टी (20, रा. गिरगाव रोड, पाचगाव, ता. करवीर), अर्थव संजय हावळ (20, कुंभार गल्ली, शाहू उद्यान), ऋषभ विजय साळोखे (21, रामानंदनगर), सोहम संजय शेळके (20, गजानन महाराजनगर, मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आर्थिक वाद आणि पूर्ववैमनस्यातून ऋषीकेश व संशयितांमध्ये गेल्या आठ-दहा महिन्यांपासून संघर्ष धुमसत होता. त्यातूनच 2 डिसेंबरला त्यांच्यात हाणामारी झाली. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या होत्या. धडधाकट शरीरयष्टीच्या ऋषीकेशकडून कोणत्याही क्षणी आपल्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. याची भीती संशयितांना होती.
ऋषीकेश सतत खुन्नस देत असल्याने संशयित सावध होते. गणेश यलगट्टी, अर्थव हावळसह चौघांनी ऋषीकेशचा कायमचा काटा काढण्याचा बेत केला होता. दारू पिण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेऊन त्याचा खून करण्याचा कटही ठरविण्यात आल्याची माहिती चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी पत्रकारांना सांगितले.
चारही हल्लेखोरांनी ऋषीकेशला मनसोक्त दारू पाजली. त्याला गांजाही ओढायला दिला. तो पूर्णपणे नशेच्या आहारी गेल्यानंतर त्यांच्यात वादावादी सुरू झाली. यावेळी झालेल्या झटापटीत ऋषीकेशने दोघांना ढकलून देत घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ऋषभ साळोखेने कमरेला लावलेला चाकू काढला अन् ऋषीकेशवर वार केला. ऋषभने एकापाठोपाठ एक असे वार केल्याने त्याच्या चेहर्यासह छाती, पोट व हातावर खोलवर जखमा झाल्या.
हल्लेखोरांशी जोरात झटापट
शरीरावर चाकूचे हल्ले झेलत ऋषीकेशने त्यातूनही स्वत:चा जीव वाचविण्याची धडपड सुरू केली. टोळीचा म्होरक्या गणेश यलगट्टी, सोहम शेळकेसह अर्थव हावळने ऋषीकेशचे दोन्ही हात व त्याच्या पोटावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला; पण ऋषीकेश चौघांनाही दाद देत नव्हता.
गणेशने आठवेळा दगडाने डोके ठेचले
या झटापटीत ऋषीकेशला जमिनीवर ढकलून देण्यात आले. तो जमिनीवर कोसळताच गणेशने मोठा दगड उचलून त्याचे डोके ठेचण्याचा प्रयत्न केला. दोन-तीनवेळा डोक्यात दगड घालूनही ऋषीकेशची धडपड सुरूच होती. तेव्हा गणेशने तब्बल आठवेळा ऋषीकेशचे डोके दगडाने ठेचल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शरीराची हालचाल थांबल्यानंतरही दगडाने ठेचले
ऋषीकेशच्या शरीराची हालचाल थांबल्यानंतरही अन्य तीन हल्लेखोरांनी त्याच्या चेहर्याचा अक्षरश: चेंदामेंदा केल्याची माहिती संशयितांच्या चौकशीतून पुढे येत असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक शिवानंद कुंभार, विक्रम चव्हाण यांनी सांगितले. बुधवारी रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
संशयित नाळे कॉलनीत जेरबंद
खुनाच्या घटनेनंतर ऋषीकेशचा मोबाईल व दुचाकी घेऊन मारेकरी पसार झाले. 24 तासांनंतरही संशयित आपल्या घराकडे परतले नव्हते. नाळे कॉलनीत संशयितांनी आश्रय घेतल्याची माहिती मिळताच करवीर व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संशयितांना अटक केली.