प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.२२ संत आणि महामानव यांच्या विचारांची बेरीज केली पाहिजे.ती आपली आजची मुख्य सामाजिक गरज आहे. सांस्कृतिक लोकशाही योग्य पद्धतीने प्रस्थापित झाल्याशिवाय संसदीय लोकशाही सुदृढपणे प्रस्थापित होऊ शकत नाही. तशी जात-पात धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रस्थापित करणे आणि तसा समाज उभारण्याच्या दृष्टीने आपली लेखणी कार्यरत ठेवणे हे वृत्तपत्र पत्रलेखकांचे कर्तव्य आहे. स्थानिक प्रश्नापासून आंतरराष्ट्रीय प्रश्नापर्यंतचे व्यापक समतावादी विचार पत्रलेखनातून रूजवण्याची गरज आहे. ते काम इचलकरंजी वृत्तपत्र लेखक संघ गेली पंचवीस वर्षे सातत्याने करत आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील हे भूषणावर असे उदाहरण आहे,असे मत ज्येष्ठ विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. ते इचलकरंजी वृत्तपत्र लेखक संघाचा रौप्यमहोत्सव मेळावा, 'लोकजागर 'स्मरणिका प्रकाशन आणि आचार्य शांताराम बापू गरुड पत्र लेखन पुरस्कार वितरण समारंभाचे संयुक्त समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. वृत्तपत्र पत्रलेखक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पिसे यांनी स्वागत प्रस्ताविक केले.संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार प्रसाद कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रारंभी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रा.डॉ. श्रीपाद सबनीस म्हणाले ,आज काळाने निर्माण केलेली आव्हानांचा यशस्वीपणे मुकाबला करायचा असेल तर आपण आपल्या सर्व जाती धर्मातील संत परंपरेचा व विचारवंतांचा मागोवा घेऊन वाटचाल केली पाहिजे. भारतीय राज्यघटनेची तत्त्वज्ञान समाजापुढे पुन्हा पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भांडवल शाही व धर्मांधतेने निर्माण केलेली आव्हाने आज जगभर माणसाला माणसापासून दूर करत आहे .अशावेळी माणूसपण जपण्याची आणि. माणूस जोडण्याची जबाबदारी वृत्तपत्र पत्रलेखकांची आहे. प्रा.डॉ.सबनीस यांनी आपल्या भाषणामध्ये राज्य ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामाजिक, राजकीय ,संसृतिक परिस्थिती, माध्यमांची जबाबदारी ,सर्वसामान्य माणसाची अवस्था, बसवेश्वरांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्व महामानवांनी समाजाला दिलेली एकतेची शिकवण यांची सविस्तर मांडणी केली.
यावेळी गेल्या वर्षभरातील प्रति महिन्याच्या एकूण बारा उत्कृष्ट वृत्तपत्र पत्रलेखकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.तसेच वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या पंचवीस वर्षाच्या वाटचालीत महत्वाची कामगिरी केलेल्या शितल बुरसे ,विनोद जाधव ,सचिन कांबळे, बाळासाहेब नरशेट्टी, गुणवंत चौगुले, दीपक पंडित, गुरुनाथ म्हातगडे, अभिजीत पटवा, दिगंबर उकिरडे ,महादेव मिणची, महेंद्र जाधव, संजय भस्मे ,रमेश सुतार, नारायण गुरबे, पंडित कोंडेकर, मनोहर जोशी,पांडुरंग पिसे,प्रसाद कुलकर्णी आदींचा सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला कोल्हापूर,सांगली, सातारा,सोलापूर,बेळगाव आदी जिल्ह्यातील वृत्तपत्र पत्रलेखक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार मनोहर जोशी यांनी मानले.अभिजित पटवा यांनी सूत्रसंचालन केले.