कन्या महाविद्यालयात वृत्तपत्र पत्रलेखन कार्यशाळा संपन्न
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.२० , वृत्तपत्रामध्ये वाचकांकडून होणारे पत्र लेखन अर्थात वाचकांचा पत्रव्यवहार हे सदर एक अविभाज्य भाग असते. या सदरातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली जाते. तसेच वेगवेगळी मते व्यक्त केली जात असतात. त्यातून विचार मंथनाला चालना मिळत असते. म्हणूनच सजग नागरिकांनी आणि खास करून तरुण वर्गाने स्वतःला व्यक्त करण्यासाठी या माध्यमाचा वापर केला पाहिजे. त्यातून होणाऱ्या सामाजिक जनजागरणाचे महत्त्व निश्चितच मोठे आहे,असे मत इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार धर्मराज जाधव यांनी व्यक्त केले. ते श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, समाजवादी प्रबोधिनी आणि वृत्तपत्र पत्रलेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'वृत्तपत्र पत्रलेखन कार्यशाळेत 'बोलत होते. अध्यक्षस्थानी गृहविज्ञान विभाग प्रमुख प्रा.संगीता पाटील होत्या. स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष जाधव यांनी करून दिला.त्यातून कार्यशाळेच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली.यावेळी समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, वृत्तपत्र पत्रलेखक संघाचे अध्यक्ष पांडुरंग पिसे ,सचिव मनोहर जोशी, सदस्य महेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. महामानवांना अभिवादन करून व रोपट्याला पाणी घालून कार्यशाळेला सुरुवात झाली.
धर्मराज जाधव म्हणाले,माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत.लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्व मोठे असते. पत्रकारांकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा असतात.त्याचवेळी पत्रकारांच्या मागेही समाजाने उभे राहिले पाहिजे.एक बातमी,एक वाचक पत्र मोठे परिवर्तन करू शकते. धर्मराज जाधव यांनी वृत्तपत्र पत्रलेखन कसे करावे याबाबत आपल्या मांडणीतून सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी प्रसाद कुलकर्णी म्हणाले ,वृत्तपत्रे समाजातील सर्व घटकांचे प्रश्न हाताळत असतात. बाल ,महिला, शेती, उद्योग, आरोग्य ,शिक्षण व्यवसाय ,गृहबांधणी असे अनेक विषय पुरवण्यांसह समोर येत आहेत.ही स्वागतार्ह बाब आहे. त्याच पद्धतीने सुदृढ समाज रचनेसाठी आर्थिक, सामाजिक ,राजकीय , संस्कृतीक क्षेत्रात तयार झालेले,होऊ घातलेले महत्वाचे प्रश्न वाचकांच्या पत्रव्यवहाराद्वारे मांडले जाणे महत्वाचे असते. समाज स्वास्थ्याच्या आणि राष्ट्र बांधणीच्या दृष्टीने सजग नागरिकांचे व्यक्त होणे गरजेचे असते.
पांडुरंग पिसे म्हणाले,वृत्तपत्र पत्रलेखनाची दखल समाज,शासन,प्रशासन या सर्व पातळ्यांवर घेतली जाते.व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचे व दिशा देण्याचे काम वृत्तपत्र पत्रलेखक करत असतो. अशा वृत्तपत्र लेखकांची संघटना म्हणून गेली २५ वर्षे इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघटना कार्यरत आहे. नवे पत्रलेखक घडविण्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरत असतात.
अध्यक्षस्थानवरून बोलताना प्रा.संगीता पाटील म्हणाल्या, पत्रलेखन ही एक कला आहे. कोणतीही कला आपण कसे आणि कशासाठी जगावे हे शिकवत असते.कला ही प्रयत्न साध्य असते. ती आत्मसात करावी लागते.पत्रलेखनाचे महत्त्व आजच्या माध्यमांच्या भाऊगर्दीच्या काळातही फार महत्त्वाचे आहे. आपण जे मांडतो त्या मांडणीची नोंद समाज घेत असतो.आपण वैचारिक दृष्ट्या व्यक्त होणे फार महत्त्वाचे असते. या वृत्तपत्र पत्रलेखन कार्यशाळेतून योग्य तो बोध घेऊन विद्यार्थिनींनी लिहिते झाले पाहिजे. अगदी या कार्यशाळेतून मला काय मिळाले या विषयावर लिहिले तरीही ती चांगली सुरुवात ठरू शकेल.या कार्यशाळेला महाविद्यालयातील सर्व अध्यापक-अध्यापिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सहभागी विद्यार्थिनींना पाहुण्यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रियंका कुंभार यांनी केले.
होत्या.आभार प्रा.प्रतिभा पैलवान यांनी मानले.