प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
नाशिक येथील कोष्टी कला मंच या संस्थेच्या वतीने निवडक कलावंतांना दिला जाणारा राज्यस्तरीय कोष्टी कलारत्न हा पुरस्कार येथील कथ्थक नृत्य कलाकार व नृत्यशिक्षिका सौ. सायली होगाडे यांना नुकताच प्रदान करण्यात आला. नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ. छायाताई देवांग आणि महाराष्ट्र प्रदेश कोष्टी सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी कलात्मक सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र तसेच शाल श्रीफळ देऊन सौ. होगाडे यांचा गौरव करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमात सौ. होगाडे यांच्याबरोबरच गणपतराव आवनकर - येवला (हस्तकला विभाग), ज्ञानेश्वर दुधाने - करकंब (पखवाज वादन), विजय वरुडे - मुंबई (छायाचित्रण विभाग), अभिनेत्री स्वरदा ठिगळे - मुंबई (अभिनय) यांना मान्यवरांच्या हस्ते कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकाशराव सातपुते, राष्ट्रीय विणकर सेवा संघाचे कार्याध्यक्ष विजयराव लोळे, महाराष्ट्र कोष्टी समाजाचे युवा कार्याध्यक्ष विजय कलढोणे, विटा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष किरणराव तारळेकर, सौ. छायाताई देवांग, कोष्टी कला मंचचे अध्यक्ष रवींद्र भुजबळ, उमेश ढगे, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते शाकंभरी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना सातपुते यांनी शुभेच्छापर व मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक रवींद्र भुजबळ यांनी केले. यावेळी निवड समितीचे प्रतिनिधी या नात्याने राजेंद्र भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ज्ञानेश्वर दुधाने यांनी पखवाज वादन सादर केले. यावेळी त्यांच्या शास्त्रीय बोलांवर आधारित पूरक कथ्थक नृत्याविष्कार सायली होगाडे यांनी सादर केला. त्यानंतर स्थानिक कलाकारांच्या शास्त्रीय व निमशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्याचबरोबर यावेळी राज्यस्तरीय उखाणा स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या संपूर्ण सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन सिद्धार्थ पन्हाळे, नाशिक यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यवाह श्रीकांत शेळके यांनी आभार प्रदर्शन केले. नाशिक येथील पंचवटी भागातील भावबंधन मंगल कार्यालयात सदरचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी इचलकरंजी येथील रामचंद्र निमणकर, दिलीप भंडारे, शुभम रोकडे त्याचबरोबर नाशिक आणि परिसरातील तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील प्रतिनिधी आणि रसिक उपस्थित होते.