प्रेस मीडिया लाईव्ह :
सुनील पाटील :
मुंबई- राज्यातील विविध भागातील पाच हजार निवासी डॉक्टर आपल्या विविध मागण्यासाठी संपावर जाणार आहेत. एकीकडे साथीचे आजार आणि कोरोना विषाणूने थैमान घातले आहे, तर दुसरीकडे डॉक्टरांनी संपाचे हत्यार उगारले आहे, त्यामुळं याचा आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडणार असून, रुग्णांची मोठी गैरसोय होणार आहे. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने पुकारलेल्या या संपामुळे आज राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर असणार आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून निवासी डॉक्टरांच्या संपाला झाली आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करुनही मागण्या पूर्ण होत नसल्याने डॉक्टर संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. यात अनेकदा मागणी केली तरी देखील मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निवासी डॉक्टर संघटनेने केला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर जाणार आहेत. यात मुंबईतील केईएम, जे.जे, सायन, सेन्ट जॉर्ज आदी अशा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सरकारी रुग्णालयांवर या संपाचा परिणाम जाणवणार आहे. या संपाचा फटका राज्यातील हजारो रुग्णांना बसण्याची शक्यता आहे.
काय आहेत डॉक्टरांच्या मागण्या...?
- महाराष्ट्रातील सर्व शासकीय, पालिका महाविद्यालयांची अपुरी व्यवस्था पूर्ण करणे
- मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे विद्यार्थ्यांच्या होणारी हेळसांड थांबवावी
- वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांची पदनिर्मितीच्या रखडलेल्या प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेणे
- सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरणे
- शासनाच्या निर्णयानुसार, 16 ऑक्टोबर 2018 प्रमाणे लागू झालेल्या तारखेपासून महागाई भत्ता तात्काळ देणे
- सध्या महाराष्ट्रातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करणे आणि सर्व वरिष्ठ डॉक्टरांना समान वेतन लागू करणे
- राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यरत वरिष्ठ निवासी डॉक्टरांना न्याय द्यावा