प्रेस मीडिया लाईव्ह
सुनील पाटील :
फेसबुकवरून श्रीमंत व्यक्तींशी मैत्री करत त्यांना हॉटेलला बोलवून त्यांच्याकडील किमती ऐवज लुबाडणाऱ्या बंटी बबलीला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांकडून पोलिसांनी 16 मोबाईल, एक रिव्हॉल्वर, दोन जिवंत काडतूस, दोन घड्याळं आणि 290 ग्रॅम सोने असा मुद्देमाल जप्त केला आहे. समृद्धी खडपकर आणि विलेंडर डिकोस्टा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मुंबईमध्ये राहणारी ही महिला श्रीमंत मुलांना लुबाडून मुंबई टू गोवा विमानाचा प्रवास करत आपल्या मित्राकडे चोरीच्या वस्तू विकण्यासाठी देत होती.
‘असा’ उघडकीस आला गुन्हा
मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या महेश पाटील यांची फेसबुकच्या माध्यमातून समृद्धी या महिलेशी ओळख झाली. या ओळखीतून या महिलेने त्यांना खोणी येथील एका हॉटेलला जेवण्यासाठी बोलावले. हॉटेलच्या बंद खोलीत जेवण झाल्यानंतर फिर्यादी बाथरूममध्ये गेला.
बाथरुममध्ये गेल्याची संधी साधत या महिलेने त्यांचे परवानाधारक रिव्हॉल्वर, एक मोबाईल, सोन्याच्या तीन चैन, हातातील सोन्याचे कडे आणि घड्याळ असा चार लाख 75 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला. या प्रकरणी महेश पाटील यांनी मानपाडा पोलिसात तक्रार दिली होती.
मात्र या महिलेचा मोबाईल नंबर किंवा पत्ता त्यांच्याकडे नव्हता. यामुळे केवळ फेसबुकच्या माहितीवरून या महिलेचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना तातडीने शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तपासात महिला मुंबईतील असल्याचे कळले
पोलीसांनी फेसबुक वरून तिचे अकाउंट चेक करत तिच्यावर काही गुन्हे आहेत का याचा शोध घेतला. यावेळी डोंबिवली रेल्वे पोलिसात तिच्याविरोधात गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून ही महिला खारमध्ये राहत असल्याचे कळताच पोलिसांनी खार गाठले.
गोव्यातून दोघांना घेतले ताब्यात
मात्र ती गोवा येथे गेल्याचे कळताच पोलिसांनी गोवा म्हापसा येथून या महिलेसह तिच्या साथीदाराला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत या महिलेने यापूर्वी देखील फेसबुकवरून श्रीमंत लोकांना हेरून त्यांचा विश्वास संपादन करत त्यांना वेगवेगळ्या हॉटेलला बोलावले.
त्यानंतर त्यांच्या दारूमध्ये गुंगीचे औषध टाकत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाईल अशा किमती वस्तू चोरून मुंबई टू गोवा विमानाचा प्रवास करत गोव्यात राहणाऱ्या विलेंडर डिकोस्टाकडे देत होती. तिथे तिचा मित्र त्या वस्तूची विल्हेवाट लावत असल्याचे उघड झाले.
मात्र बदनामीच्या भीतीने आतापर्यंत कोणीही आपल्या विरोधात तक्रार करत नसल्याने तिचे मनोबल वाढले अशी माहिती तिने तपासात दिली. चोरलेल्या वस्तूची गोव्यातील आपला साथीदार विलेंडर डिकोस्टा याच्या मदतीने विल्हेवाट लावत होती.
पोलिसांनी या आरोपींकडून 16 मोबाईल एक रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसे, दोन महागडी घड्याळे आणि 290 ग्रॅम सोन्याचे दागिने असा 20 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या महिलेवर यापूर्वी डोंबिवली रेल्वे आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.