प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : निवासी वैद्यकीय संघटनेने (मार्ड) पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसल्याने राज्यातील शासकीय रुग्णालयांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.निवासी वैद्यकीय संघटनेने राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी केली असून एक जानेवारीपासून बेदमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वीही अशाच मागणीसाठी संप झाला होता. मात्र महाराष्ट्र सरकारने या डॉक्टरांची मागणी मान्य केलेली नाही, त्यामुळे संपाचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर, सीमाभाग तसेच तळकोकणापर्यंत रुग्णांचा आधारवड असलेल्या सीपीआर रुग्णालयावर या संपाचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. सीपीआरमधील जवळपास 80 निवासी डॉक्टर संपावर जाणार असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होण्याची भीती आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी अर्थात एमडी किंवा एमएसचे शिक्षण घेणारे विद्यार्थी डॉक्टर शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सेवेत मदत करतात. त्यांना राज्यभरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दरमहा किमान 75 हजार रुपयांचे मानधन देण्यात येते. अशा प्रकारची सेवा मुंबईमध्येही देण्यात येते. तेथील निवासी डॉक्टरांना एक लाख रुपयांचे मानधन आहे. त्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सेवेचा ताण सोसून काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांनाही एक लाख रुपयांचे मानधन द्यावे, या मागणीसाठी हा संप होणार आहे.
हा संप राज्यव्यापी असल्याने त्यात येथील डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. येत्या १ जानेवारीपर्यंत निवासी डॉक्टर्सच्या मागणीचा राज्य शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी राज्यस्तरीय निवासी डॉक्टर्सच्या समितीने केली आहे. ही मागणी मान्य झाली तरच कदाचित हा संप मागे घेण्यात येईल.