प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाउन होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांना शुक्रवारी ताटकळत रांगेत उभे रहावे लागले.शुक्रवारी सर्व्हरमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात सदनिका, दुकान आणि जतीन यांची खरेदी- विक्री करार, हक्कसोड, बक्षीसपत्र आदी प्रकारचे दस्त नोंदविले जातात. त्यामुळे सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची नेहमीच गर्दी असते. त्यातच नोंदणी प्रणालीचा सर्व्हर डाउन होणे, सर्व्हरचा वेग कमी असणे आदी कारणांमुळे दस्त नोंदणीस वेळ लागतो. त्याच दिवशी दस्त नोंदणी नाही झाली तर नागरिकांना दुसऱ्या दिवशी हेलपाटे मारावे लागत आहे. शुक्रवारी शहरी भागातील काही दुय्यम निबंधक कार्यालयात रात्री उशिरापर्यंत नागरिक थांबले होते. सकाळी सव्वाअकरा वाजता 80 वर्षांच्या नागरिक दस्त नोंदणीसाठी आल्या होत्या. मात्र सर्व्हरमधील अडचणींमुळे दस्त नोंदणीचे काम सायंकाळी सहा वाजता पूर्ण झाले आणि ते सव्वासहा वाजता दुय्यम निबंधक कार्यालयातून बाहेर पडले, अशी माहिती पक्षकारांनी दिली.
वारंवार अडथळे…
“आठवड्यातून दोनदा तरी अशा प्रकारची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात आहे. सर्व्हर डाऊन होत असल्याने कामच होऊच शकत नाही किंवा संथ गतीने काम होते. तरीही दस्त नोंदणीच त्याच दिवशी पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी पुन्हा वाढतच असते.
दस्त नोंदणीवेळी नागरिक मुद्रांक शुल्क नोंदणी व मुद्रांक विभागाकडे जमा करतात. मुद्रांक शुल्क भरूनही दस्त नोंदणीची कामे वेळेवर पूर्ण होत नाही. नोंदणी विभागाने सर्व्हरच्या या समस्येवर तोडगा काढायला पाहिजे. जेणेकरून नागरिकांना चांगल्या सेवा मिळतील आणि दस्तनोंदणीचे काम वेळेवर पूर्ण होईल.
– ऍड. नितीन दसवडकर, वकील