प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कात्रज-भिवरी, ढोणेवाडी गराडे मार्गे सासवडला जाणाऱ्या पीएमपी बसवरील चालकाने नियंत्रण सुटून ढोणे वाडीजवळ अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. यामध्ये १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अपघातानंतर चालक पळून गेला होता.
पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) कात्रज-भिवरी मार्गे सासवडला बस धावते. रविवारी दुपारी ही बस सासवडला निघाली. बोपदेव घाट ओलांडल्यानंतर चालकाने बस वेगात चालविण्यास सुरुवात केली.त्यावेळी काही प्रवासी व वाहकाने देखील बस हळू चालविण्यास सांगितले. ढोणेवाडी येथे उतारावर चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले. ती बस रस्त्याच्या खाली जाऊन खड्ड्यात आदळली. या बसमध्ये असलेले १२ ते १५ प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर चालक पसार झाला.
या अपघाताची माहिती गराडे गावातील नागरिकांना मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या प्रवाशांना तत्काळ बाहेर काढले. त्यांना सासवड येथील शासकीय रुग्णालय, भिवरी येथील डॉ. निरगुडे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. काही जणांच्या हात व पायाला फॅक्चर आल्याचे दिसून आले. तर काही जणांच्या डोक्याला मार लागला होता, अशी माहिती गराडे गावातील ग्रामस्थांनी दिली.