कोयता गँगचा बंदोबस्त करा :: शहराध्यक्ष साईनाथ बाबर

 


पुणे प्रतिनिधी : मांजरी बुद्रुक व हडपसर परिसरातील कोयता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासन कडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी केली आहे .

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता गँगने दहशत पसरवली आहे. त्यांच्यावर पोलिसांचा वचक नसल्याने जो ग्रामस्थ त्यांना विरोध करतो त्यांच्या घरावर दडगफेक केली जात आहे. कोयता गँगच्या दहशतीमुळे स्थानिक ग्रामस्थ तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. 

हडपसर पोलीस या टोळीवर अंकुश ठेवण्यात कमी पडत असल्याने मांजरी येथील स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात एकत्र जमून याचा निषेध नोंदवला. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मांजरी , काळेपडळ , गंगानगर या परिसरात गुन्हेगारांच्या टोळ्यांचा वावर वाढला आहे. 

या भागात आपल्या टोळीचे वर्चस्व राहावे,यासाठी दोन टोळ्यांमध्ये वाद होत असतात. यादरम्यान मांजरी परिसरात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली असून,याचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अडवून त्यांना लुटणे,महिलांचे दागिने लुटणे, हवेत कोयते फिरवून दहशत निर्माण करणे अशा घटनांमुळे मांजरी येथील नागरिक भयभीत झाले आहेत. 

या टोळीवर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे शहराचे पोलीस आयुक्त व राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन देणार आहोत अशी माहिती शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post