प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे – महावितरणच्या भरारी पथकाने पुणे प्रादेशिक विभागात 3 कोटी 56 लाख 60 हजार रुपयांची 75 वीज चोरीची प्रकरणे गेल्या नोव्हेंबरमध्ये उघडकीस आणली आहे. या वीज चोरीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. यात 4 प्रकरणात मोठ्या प्रमाणावर वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
नोव्हेंबरमध्ये पुणे ग्रामीण भागातील उरुळीकांचन परिसरात रात्रीच्यावेळी भरारी पथकाने धाड टाकून पेट्रोल पंपाची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या व्यावसायिक ग्राहकाने मीटरला जंपर टाकून बायपास करून वीजचोरी केल्याचे दिसून आले. या ग्राहकास 90 हजार 179 युनिटचे 19 लाख 42 हजार 182 रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले आहे.
पुणे शहर भागातील 80 केडब्ल्यू जोडभार असलेल्या व्यावसायिक ग्राहकाची (उद्योजक) वीजचोरी पकडण्यात आली. या व्यावसायिक ग्राहकाने मीटरच्या आधी एल.टी. केबलला टॅप करून मीटर बायपास करून वीजचोरी केली होती. या ग्राहकानी 80 हजार 438 युनिटसची चोरी केल्याचे तपासात उघड झाले असून त्यांना 28 लाख 14 हजार रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले आहे.
तिसऱ्या प्रकरणात कोल्हापूरमधील इचलकरंजी आणि चौथे प्रकरण सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील आहे. वीजचोरीची रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना नियमानुसार मुदत देण्यात आली. ही रक्कम न भरल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.