प्रेस मीडिया लाईव्ह:
पुणे : मूलभूत नागरी सुविधा महानगरपालिकेला पुरेशा प्रमाणात देता येत नाहीत. समाविष्ट गावांमधून केवळ अवाजवी कर गोळा करुन आमच्या घरांवर कारवाई करण्यासाठीच आमची गावे महानगरपालिकेत घेतली आहेत का ?, असा सवाल पूर्व हवेली तालुक्यातील समाविष्ट गावांतील नागरिकांनी केला आहे. या पुढे पुरेशा सुविधा न देता कारवाईचा बडगा उगारल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
पूर्व हवेली तालुक्यातील उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी, होळकरवाडी, हांडेवाडी, उरुळी देवाची, फुरसुंगी या गावांचा पुणे महापालिकेत समाविष्ट झाला आहे. मात्र, सुविधांचा वाणवा आहे. या गावांना कोणी वालीच उरला नाही. पालिका प्रशासन केवळ भरमसाठ टॅक्स गोळा करुन गोरगरीबांची घरे पाडण्यासाठी सरसावात आहे. सुविधा पुरविताना मात्र विविध कारणे दिली जात आहेत. त्यामुळे आमची ग्रामपंचायतच बरी होती, अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. समाविष्ट गावांतून कोट्यवधी रुपयांचा कररुपी महसूल गोळा होत असताना पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे मूलभूत नागरी सुविधादेखील मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर आम्हाला सुसज्ज व दर्जेदार रस्ते, वीज, शुद्ध व पुरेसे पाणी, आरोग्य सुविधा मिळतील हे ग्रामस्थांचे स्वप्न दिवास्वप्नच ठरले आहे. या गावांत मोठमोठ्या टाउनशिप, सोसायट्यांचे बांधकाम, कंपन्यांचे प्रकल्प सुरु असल्याने कोट्यवधींचा महसूल पालिकेला मिळत आहे. त्यामुळे निधी असुनही गावचा विकास खुंटुन सामान्य नागरिक हैराण झाला आहे. गोरगरिबांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता पालिकेच्या कारभाराला पुरती कंटाळली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष व माजी सरपंच निवृत्ती बांदल म्हणाले की, पुणे महानगरपालिका प्रशासनाला पुरेशा मूलभूत नागरी सुविधा देता येत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी काबाडकष्ट करुन प्रसंगी कर्ज काढून जागा विकत घेऊन बांधलेली घरे अनधिकृत ठरवून पाडण्यासाठी पालिका प्रशासन जी तत्परता दाखविते. तशीच तत्परता पाणी, रस्ते, आरोग्य, ड्रेनेज आदी समस्या सोडविण्यासाठी दाखविली पाहिजे. त्यामुळे यापुढे सुविधा न देता कारवाईचा बडगा उगारल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.