आता नागरिकांना आपल्या वाहनावर किती चलन आहे, याची माहिती मिळणार
प्रेस मीडिया लाईव्ह :
पठाण एम एस :
पिंपरी : -महाराष्ट्र पोलिसांनी महाट्राफिक ऍप सुरू केले आहे. त्यामध्ये नागरिकांना आपल्या वाहनावर किती चलन आहे, याची माहिती मिळणार आहे. त्यावर भरलेली दंडाची रक्कम समजणार असून चुकीच्या चलनाबद्दल तक्रारही करता येणार आहे.नागरिक महाट्राफिक ऍपच्या माध्यमातून इतर वाहनांची तक्रार देखील करू शकणार आहेत. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी नागरिकांनी हे ऍप डाऊनलोड करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
महाट्राफिक ऍपमध्ये मोबाइल क्रमांक, वाहन क्रमांक नमूद करून रजिस्ट्रेशन करता येईल. त्याद्वारे आपल्या वाहनावर किती ई चलन प्रलंबित आहे. आपल्या वाहनावर कोणत्या ठिकाणी व कोणत्या कलमान्वये ई चलन झाले आहे, याची माहिती मिळेल. दंड भरण्यासाठी विविध पेमेंट पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दंडाची रक्कम भरली असल्यास त्याचाही तपशील त्यात दिसणार आहे. चुकीचे ई चलन झाले असेल तर त्याबाबत तक्रार देखील करता येऊ शकते. त्यामुळे महाट्राफिक ऍप हे नागरिकांच्या फायद्याचे ठरत आहे.
सर्व नागरिकांनी महाट्राफिक ऍप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. त्यातील सुविधांची माहिती घ्यावी. वाहतूक नियमांचे पालन करावे. दंड होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. आपल्या वाहनांवर पेंडिंग चलन असेल तर जवळच्या वाहतूक पोलिसांकडे जाऊन दंड भरावा.
– सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा
एकाच ठिकाणी जाणून घ्या 219 प्रकारचे दंड
वाहन चालविताना हेल्मेट घालणे, सीटबेल्ट लावणे अशा मोजक्या नियमभंगाची माहिती नागरिकांना असते. मात्र, तब्बल 219 प्रकारचे नियम असून त्याबाबत कोणत्या कलमान्वये किती रुपये दंडाची कारवाई होऊ शकते, याची माहिती महाट्राफिक ऍपमध्ये देण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये दंडाची रक्कम निश्चित नसून न्यायालयात हजर करून पुढील कारवाई केली जाते. त्याबाबत देखील ऍपमध्ये माहिती देण्यात आली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारेही कारवाई सुरू
पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत चौकाचौकात शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचे स्मार्ट सिटीच्या नियंत्रण कक्षातून संचालन केले जात आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर निगराणी ठेऊन ई चलन कारवाई केली जात आहे. ई चलन कारवाई झाली असल्यास महाट्राफिक ऍपमधून अथवा जवळच्या वाहतूक पोलिसांकडे जाऊन दंड भरता येऊ शकतो.
चिन्हांची माहिती
रस्त्याने जात असताना अनेक चिन्हे दिसतात. मात्र, त्याचा अर्थ माहिती नसल्याने आपला गोंधळ उडतो. त्यामुळे महाट्राफिक ऍपमध्ये 17 प्रकारच्या चिन्हांची माहिती सचित्र देण्यात आली आहे. रोड सेफ्टीसाठी हेल्मेट, सीटबेल्ट आणि स्पीडींगचीही माहिती देण्यात आली आहे.
नागरिकही करू शकतील कारवाई
रस्त्याने जात असताना एखादा वाहन चालक नियमभंग करत असेल तर त्याची तक्रार महाट्राफिक ऍपद्वारे करता येऊ शकते. ट्रिपल सीट, हेल्मेट, सीटबेल्ट, स्टॉप लाईन, मोबाइल टॉकिंग, रॉंग पार्किंग, फॅन्सी नंबर प्लेट आणि इतर प्रकारचे नियमभंग करणाऱ्या वाहनाचे तीन फोटो आणि माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याची वाहतूक पोलिसांकडून खातरजमा करून संबंधित वाहनावर ई चलन कारवाई केली जाते. त्यामुळे केवळ वाहतूक पोलीस दिसताच नियम पाळण्याचा अट्टाहास करणारे नागरिकांच्या जाळ्यात अडकू शकतात. याव्यतिरिक्त अपघात, ब्रेकडाऊन, रोड रेज, रोड कन्स्ट्रक्शन, ऑइल सांडणे, पाणी साचणे, झाड पडणे आणि अन्य प्रकारची माहिती देखील महाट्राफिक ऍपद्वारे देता येईल.