गुन्हे शाखा युनिट एकने चोरट्यांचा माग काढून एकाला राजस्थान मधून अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या 20 लाखांच्या दोन कार जप्त करण्यात आल्या
प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी -राजस्थान येथील अफीम तस्करांनी अफीमच्या तस्करीसाठी पिंपरी चिंचवड शहरात येऊन एकाच रात्री दोन आलिशान कार चोरल्या. गुन्हे शाखा युनिट एकने चोरट्यांचा माग काढून एकाला राजस्थान मधून अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या 20 लाखांच्या दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातून राजस्थानला जात असताना आरोपींनी रस्त्यात कारच्या नंबर प्लेट बदलल्या. असे असतानाही पोलिसांनी चार दिवस राजस्थानात पाळत ठेवून या प्रकरणाचा छडा लावला.
रमेश प्रभुराम बिष्णोई (वय 24,, रा. जि. जालोर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार सरेश वाडाराम (रा. बाडमेर, राजस्थान) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबर रोजी प्राधिकरण, निगडी येथील एका सोसायटीमधून दोन महागड्या कार चोरीला गेल्या. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट एकने गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना आरोपींचा माग काढला. चोरीच्या दोन्ही कार पिंपरी चिंचवड मधून नाशिकच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी राजस्थान येथे गेल्याचे समजले. दरम्यान आरोपींनी नाशिक परिसरात चोरीच्या कारच्या नंबर प्लेट बदलून पुढचा प्रवास केला.
आरोपींच्या प्रवासात चोरीच्या दोन्ही कार सोबत तिसरी कार आढळल्याने पोलिसांनी तिसऱ्या कार बाबत माहिती घेतली. त्या कारच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तिसऱ्या कारचा पाठलाग करून गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार बाळू कोकाटे, महादेव जावळे, फारूक मुल्ला, सोमनाथ बो-हाडे, प्रमोद हिरळकर यांनी थेट राजस्थान मधील सांचोर, जि. जालोर हे गाव गाठले. चार दिवस पाळत ठेऊन या पथकाने माहिती मिळवली.
आरोपी रमेश बिष्णोई आणि त्याचे साथीदार अफिम तस्कर असून त्यांच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ते राजस्थान पोलिसांना गुंगारा देत होते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी बिष्णोई याला सांचोर येथील मार्केट मधून शिताफीने ताब्यात घेतले. त्याने कार चोरल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करून चोरी केलेल्या दोन कार पोलिसांनी ताब्यात घेतल्या. दरम्यान पोलिसांची चाहूल लागल्याने बिष्णोई याचे अन्य साथीदार पळून गेले.
बिष्णोई याने दोन्ही कार सुरेश वाडाराम (रा. बाडमेर, राजस्थान) याच्या मदतीने चोरल्या. वाडाराम हा एनडीपीएस गुन्ह्यात फरार होता. चोरलेल्या कारची नंबर प्लेट आणि इंजिन नंबर बदलून हे आरोपी त्या कारमधून अफीमची तस्करी करत असत. कारची विल्हेवाट लावण्यापूर्वीच आरोपीला अटक करून चोरीच्या कार परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस अंमलदार बाळु कोकाटे, महादेव जावळे, फारूक मुल्ला, सोमनाथ बो-हाडे, मनोजकुमार कमले, प्रमोद हिरळकर, तात्रीक शाखेचे हवालदार प्रशांत माळी यांच्या पथकाने केली आहे.