प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी : नवीन वर्षानिमित्त प्रत्येकजण चांगल्या सवयी अंगीकृत करण्याचा संकल्प करतो. पिंपरी-चिंचवड शहराचे नवे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखून आदर्श पोलिसिंग करत शहराला गुन्हेगारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.आपण केलेल्या संकल्पाबाबत दररोज प्रयत्न करणार असल्याचे पोलीस आयुक्त चौबे यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त चौबे यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथम सर्व पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. ठाणे प्रभारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, हद्दीतील गुन्हेगारीचे स्वरूप, पोलिसांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत आयुक्तांनी पोलिसांना सूचना दिल्या. पोलिसांचा वावर समाजात दिसला पाहिजे. परिसरातील महत्वाच्या ठिकाणी पोलीस असतील. पोलिसांची वाहने पोलीस ठाण्यात नाही तर शहरात गस्तीवर असतील. रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी. परिसरातील महत्वाच्या ठिकाणी पोलीस दिसल्यास नागरिक थेट पोलिसांकडे समस्या मांडू शकतील. त्यामुळे किरकोळ वाद, समस्या तात्काळ मार्गी लागतील. नागरिकांना चौकीत, पोलीस ठाण्यात जाण्याची गरज लागणार नाही, अशा प्राथमिक सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, समाजकंटकांवर कारवाई करणे, वाहतुकीचे नियोजन करणे, सायबर गुन्हे सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी पोलिसांना प्रशिक्षित करणे, पोलीस आयुक्तालयातील पायाभूत सुविधा, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस मुख्यालय, मैदान, बॉम्ब शोधक नाशक पथक, श्वान पथक आणि अन्य पथके आदींबाबत वर्षभरात प्रयत्न केले जातील, असेही आयुक्तांनी सांगितले. तसेच पोलीस वेलफेअर फंडातून पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यावरही भर असेल.आकडे वाढले तरी चालतील पण…वारंवार गुन्हे घडण्याची ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी उपाय केले जातील. अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होत नसल्याने संबंधित लोक पोलीस रेकॉर्डवर येत नाहीत. त्याचा ते गैरफायदा घेतात आणि पुन्हा गुन्हे करतात. गुन्हेगारांचे रेकॉर्ड बनणे आवश्यक आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण येते. गुन्हे दाखल होण्याचे तसेच गुन्हेगारांचे आकडे वाढले तरी चालतील, पण गुन्हेगारी मानसिकता असलेला प्रत्येकजण रेकॉर्डवर येणे आवश्यक आहे. त्याबाबत देखील पुढील काळात कार्यवाही केली जाणार असल्याचे चौबे यांनी सांगितले.
पोलीस आणि नागरिक हे दोन्ही घटक परस्पर पूरक आहेत. त्यामुळे एकमेकांच्या मदतीने शहराला गुन्हेगारीमुक्त करूयात. पोलीस सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेत. नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे. नवीन वर्षानिमित्त सर्वांनी सकारात्मक संकल्प करावेत.
विनयकुमार चौबे. पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड