प्रेस मीडिया लाईव्ह :
राजकीय पक्ष देखील स्वतःच्या स्वार्थासाठी रिक्षा चालकांना वेगळ्या दिशेला घेऊन जात आहेत. संघटनेसह वैयक्तिकरित्या आपल्याला बदनाम केले जात असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. हे बोगस प्रतिनिधी रिक्षा चालकांना संकटात टाकून कायद्याच्या कचाट्यात सापडण्यास भाग पाडत आहेत. रिक्षा चालकांनी अशा बोगस प्रतिनिधींचा डाव उधळवून लावावा, असे आवाहनही बाबा कांबळे यांनी केले.
रिक्षा चालक-मालकांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनावरून रिक्षा संघटनांमध्ये फूट पडली असून ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे.
बाबा कांबळे म्हणाले की, प्रशासनाच्या सहकार्याने आणि कायदेशीर मार्गाने लढा उभारून रिक्षा चालकांचे प्रश्न सोडविता येतात. आंदोलन करताना नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची खबरदारी रिक्षा चालकांनी घेतली पाहिजे. ही भूमिका महाराष्ट्र रिक्षा पंचायतची आहे. रिक्षांची तोडफोड, संप करण्यासाठी जबरदस्ती करून कायदा सुव्यवस्था बिघडवू नये, अशी भूमिका संघटनेने सातत्याने मांडली आहे. नागरिकांनी देखील संघटनेच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. रिक्षा चालक असणाऱ्या बांधवांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकविणे योग्य नाही. कर्ज, महागाई, चुकीच्या प्रवासी कंपन्यांच्या वाहतुकीमुळे रिक्षा चालक बेजार आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायतने चुकीच्या लोकांचे मनसुबे ओळखून विरोध केला. त्यामुळेच संघटना व वैयक्तिक बदनामी सुरू केली आहे. रिक्षा संघटनांच्या समितीतून महाराष्ट्र रिक्षा पंचायत बाहेर पडत आहे. समितीमधून बाहेर पडलो असलो तरी रिक्षा चालक, मालक यांच्या मागणीसाठी, प्रश्नांसाठी कायदेशीर मार्गानेच लढा उभारून यश मिळवून देऊ, असे बाबा कांबळे म्हणाले. ज्यांना ही भूमिका योग्य वाटते त्या रिक्षा चालक बांधवांनी साथ द्यावी, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले.