किमान वेतन, पीएफ मागणीसाठी 'आप'च्या नेतृत्वात टिप्परचालकांचा सत्याग्रह

 आंदोलनाच्या पहिल्या दिवशी काळ्या फिती लावून काम




प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : शहरातील दैनंदिन कचरा उठाव टिप्परच्या माध्यमातून होतो. दोन ठेकेदारांच्या माध्यमातून डी एम एंटरप्राइजकडे 107 व शिवकृपा एंटरप्राइजकडे 65 टिप्पर कार्यरत आहेत. यातील डी एम एंटरप्राइज या ठेकेदाराकडून 7400 इतके तुटपुंजे वेतन टिप्पर चालकांना दिले जाते. अनेक टिप्पर चालकांचे अद्याप इ एस आय कार्ड मिळालेले नाहीत, त्यामुळे एखाद्या चालकाचा अपघात झाल्यास त्याला आरोग्य विमा मिळत नाही. चालकांचे प्रॉव्हिडेंट फंड भरणे बंधनकारक असून देखील डी एम ने फक्त काहीच चालकांचे पी एफ भरले आहे. 

टिप्पर चालक हे कुशल कामगार श्रेणीत येत असल्याने त्यांना त्यानुसार किमान वेतन द्यावे, प्रॉव्हिडेंट फंड जमा करावे, इ एस आय कार्ड काढावे या मागण्यांसाठी आम आदमी पार्टीने सत्याग्रह आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी टिप्पर चालकांनी काळ्या फिती लावून काम केले. बुद्ध गार्डन येथील के एम टी डेपो येथे जमून टिप्पर चालकांनी घोषणाबाजी केली. शहर संघटक सूरज सुर्वे यांनी या आंदोलनाचे नियोजन केले. 

टिप्पर चालकांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांना किमान वेतन, पी एफ व इ एस आय आरोग्य विमा मिळाला पाहिजे यासाठी 'आप'ने टिप्परचालकांना सोबत घेऊन सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे सत्याग्रह सुरू राहणार असल्याचे 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा युवाध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, विजय हेगडे, प्रथमेश सूर्यवंशी, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, नितीन कवाळे, रणजित बुचडे, अर्जुन बुचडे, संजय राऊत, युवराज कवाळे, करण चौधरी, जयसिंग चौगुले आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post