प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ए. एस. ट्रेडर्स कंपनीचे संचालक आणि गुंतवणूकदारांची ऑनलाइन बैठक रविवारी (दि.११) सायंकाळी झाली. या बैठकीत बोलताना कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार याने कंपनीचे पैसे ट्रेडिंगशिवाय अन्यत्र गुंतवल्याची कबुली दिली, तसेच यापुढे ट्रेडिंग शिवाय इतर ठिकाणी गुंतवणूक केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.तसेच बंद झालेले परतावे १५ जानेवारीपासून सुरू होतील, असे आश्वासन दिले. दरम्यान, गुंतवणूकदारांचा तगादा टाळण्यासाठीच कंपनीच्या प्रमुखाकडून दिशाभूल सुरू असल्याचा आरोप विरोधी कृती समितीने केला आहे.
ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून कंपनीचा प्रमुख लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार हा पहिल्यांदाच रविवारी ऑनलाइन मिटिंगद्वारे गुंतवणूकदारांसमोर आला. कंपनीची भूमिका मांडताना त्याने ट्रेडिंगशिवाय अन्य ठिकाणी पैसे गुंतवल्याची कबुली दिली. यापुढे ट्रेडिंगशिवाय अन्य क्षेत्रात गुंतवणूक केली जाणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. गुंतवणूकदारांचे थांबलेले परतावे १५ जानेवारीनंतर सुरू होतील, असा नवा मुहूर्तही त्याने सांगितला.
कंपनीचे कामकाज सुरू करण्याबद्दल त्याने बैठकीतून ग्रुप लीडर्स आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. मात्र कंपनीची कार्यालये नेमकी कधीपासून सुरू करणार, त्याबद्दल काहीच भाष्य केले नाही. एकतर्फी निवेदनात त्याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचेही सांगितले. कंपनीचा संचालक अमर चौगले यानेही बैठकीत गुंतवणूकदारांशी संवाद साधताना परतावे पुन्हा सुरू होतील, असा विश्वास व्यक्त केला.