कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींपैकी हातकणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींमध्ये मतदान होत आहे.तालुक्यातील पट्टणकोडोली, रेंदाळ आणि इंगळी या ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत चुरशीने मतदान सुरू आहे. पट्टणकोडोली हे अतिसंवेदनशील गाव असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश वैजने, अप्पर पोलिस अधीक्षक निखेश खाटमोडे, हुपरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी पट्टणकोडोली मतदान केंद्रांवर भेट देत पाहणी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
मतदान केंद्रांवर 144 कलम लागू
कोल्हापूर जिल्ह्यात 430 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार असल्याने मतदान केंद्रांवर 144 कलम लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश जारी केला आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात राजकीय पक्षांचे बुथ लावणे, प्रचार साहित्य बाळगणे तसेच मोबाईलचा वापरास प्रतिबंध आहे. सध्या निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी 137 गावे संवेदनशील आहेत. या गावांवर पोलिस प्रशासनाचे विशेष लक्ष आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील 60 गावांमधील सरपंच व विविध गावांमधील 847 सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. दुसरीकडे सरपंच पदासाठी 414 जागांसाठी 1193 उमेदवार तर सदस्यपदाच्या 4 हजार 402 जागांसाठी 8995 उमेदवारांचे भवितव्य आज मशीन बंद होईल. जिल्ह्यात निवडणुकीसाठी 2015 केंद्रे आहेत. यासाठी 10 हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या कालावधीत मतदान होणार आहे. मतमोजणी मंगळवारी होणार आहे.
निवडणुकीसाठी कोल्हापूर पोलिस सज्ज
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी कोल्हापूर पोलिस सज्ज आहेत. सर्वच मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शीघ्र कृती दल आणि राज्य राखील पोलिस दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 4 हजार पोलिस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. बाहेरील जिल्ह्यातील 10 अधिकारी,100 कर्मचारी मदतीला घेण्यात आले आहेत. करवीर, शिरोळ, कागल आणि हातकणंगले तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. त्यामुळे या चार गावांमध्ये कारभारी ठरवण्यासाठी सर्वाधिक चुरस आहे. विधानसभेची गणिते या निवडणुकीतून निश्चित होतील.