प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने राज्यातील संघटित व असंघटित कामगार तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांगीण उन्नती व प्रगतीकरिता सातत्याने विविध योजना व उपक्रमांचे आयोजन करून सर्वार्थाने त्यांचे हित जोपासले जाते. ज्यायोगे मंडळ व कामगार वर्ग यांचे दृढ संबंध निर्माण झालेले आहेत. राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या घटनेत नमूद असलेप्रमाणे समाजातील सर्वच घटकांप्रती अविरतपणे कार्य करून राज्य व देश पातळीवर असोसिएशनच्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.
सध्या राज्य व केंद्र सरकारच्यावतीने जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने विधायक व आश्वासक पावले उचलली जात आहेत. या कारणाने सर्वसामान्यांना आरोग्य विषयक सोई-सुविधा मोफत मिळत आहेत. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व यशोदर्शन फाउंडेशन यांच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवयवदान व देहदान याबाबत जनजागृती व्हावी, ज्यायोगे गरजू रुग्णांना लवकरात लवकर योग्य ते उपचार मिळून, संबंधित कुटुंबियांवर ओढवणारे कटू प्रसंग टळावेत यासाठी, असोसिएशनच्यावतीने सातत्याने प्रबोधनात्मक कार्यक्रम, कामगार मेळावे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. अशा विविध कारणांना अनुसरून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गट कार्यालय कोल्हापूरच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवयवदान व देहदान याबाबत कामगार वर्गामध्ये जनजागृती व्हावी यासाठी मंडळाच्यावतीने जास्तीत जास्त कार्यक्रमांचे आयोजन करावे. या समाजाभिमुख कार्यासाठी असोसिएशनच्यावतीने यशोदर्शन फाउंडेशनचे प्रमुख योगेश अग्रवाल व इतर सहकारी कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता सेवाभावीवृत्तीने व्याख्याने देण्यासाठी उपस्थित राहतील. अशा आशयाचे निवेदन कोल्हापूरचे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांना राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचेवतीने देण्यात आले. यावेळी कल्याण निरीक्षक राजेंद्र निकम, केंद्र संचालक संघसेन जगतकर, चंद्रकांत घारगे, सचिन शिंगाडे आदी. अधिकारी उपस्थित होते. सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, कामगार मंत्री, प्रधान सचिव कामगार व मंडळाचे कल्याण आयुक्त यांना पाठविणेत आलेल्या आहेत. यावेळी निवेदन देताना शिष्टमंडळामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर, खजानिस महादेव चक्के, कार्याध्यक्ष भगवान माने, विभागीय सदस्य शिवाजी चौगुले, संभाजी थोरात, संजय सासणे, अनिता काळे आदी. मान्यवर उपस्थित होते.