प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर, (जिमाका): आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारताच्या उद्दिअष्ट्यपूर्तीसाठी राष्ट्रपतींनी 9 सप्टेंबरला प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समुह, व्यक्ती, यांनी आपल्या तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन किमान एक वर्षासाठी दत्तक घेवून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी दिली.
या आवाहनाला प्रतिसाद देत अमल महाडिक यांनी 500 रुग्णांना दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते त्यापैकी 2 रुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपात पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. अमल महाडिक यांच्या निर्णयाचे कौतुक करत समाजातील इतर दानशूर लोकांनीही अशा पद्धतीने अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले. यावेळी खा.धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाडीक परिवाराच्या दातृत्वाबद्दल मंत्री महोदयांनी कौतुक केले व त्यांचा सत्कार केला, असे डॉ. कुंभार यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत क्षयरोगाचे निराकरण करण्याचे धोरण निश्चित केले आहे. ज्या व्यक्तीचा आहार पोषक नाही अशा व्यक्तींमध्ये क्षयरोगाचे प्रमाण अधिक असते. अशा व्यक्तींना उपचार कालावधीत पोषण आहार मिळाला नाही तर त्यांना उपचार मिळूनही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतातच असे नाही. यामुळे क्षयरुग्णांमध्ये पोषक आहार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे क्षयरुग्णांसाठी फूड बास्केट तयार करण्यात आली आहेत. हा पोषण आहार घेण्याची अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी पुढाकार घेऊन पोषण आहारासाठी मदत करावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.