प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रातील मत
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.२५, सरणारे २०२२ हे वर्ष जागतिक ,भारतीय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनेही राजकारण ,अर्थकारण,समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात अनेक लक्षणीय घडामोडी घडवणारे ठरले आहे. तसेच नव्याने पुन्हा कोरोनाचे संकट उभे राहील की काय अशी चिंताजनक परिस्थिती आहे .या सर्व पार्श्वभूमीवर येणाऱ्या वर्षांमध्ये सर्वांगीण समतेच्या प्रस्थापनासाठी सुरू असलेल्या सामूहिक विचार जागराची व्याप्ती आणि परिघ वाढत गेला पाहिजे,असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. 'सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत' या विषयावर हे चर्चासत्र आयोजित केले होते. प्रारंभी सिक्किम येथील अपघातात मृत्युमुखी पडलेले सोळा जवान , बेळगाव येथील ज्येष्ठ कार्यकर्ते ऍड.राम आपटे , तसेच इचलकरंजी येथील लक्ष्मी प्रोसेसचे चेअरमन मुकुंद फाटक यांचे चिरंजीव सर्वेश मुकुंद फाटक यांना आदरांजली वाहण्यात आली.
या चर्चासत्रात रशिया युक्रेन युद्धापासून महाराष्ट्रातील सत्तांतरापर्यंत आणि भारत जोडो यात्रेपासून विविध राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालापर्यंत सरत्या वर्षातील अनेक गोष्टींचा आढावा घेण्यात आला. तसेच २०२३ ला सामोरे जात असताना आर्थिक, राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक परिस्थितीबाबतही चर्चा करण्यात आली. सर्व क्षेत्रीय प्रदूषण वाढत आहे आणि राजकारण हे फक्त आणि फक्त सत्ताकारण बनत चाललेले आहे. सर्वसामान्यांच्या उद्धाराची ,त्यांचे जीवनमान सुधारण्याची राजकीय, आर्थिक धोरणे राबवण्यासाठी लोकचळवळ उभी राहण्यासाठी लोक जागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे .जनतेच्या जागृतीतूनच सामाजिक, आर्थिक ,राजकीय व सांस्कृतिक पर्यावरण समृद्ध होत असते.ते करण्यासाठी कटिबद्ध राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. असा संदेश सरत्यावर्षाने दिला आहे तो ध्यानात घेऊन नव्या वर्षाची वाटचाल केली पाहिजे असे मत या चर्चेतून पुढे आले. या चर्चेत प्रसाद कुलकर्णी,दयानंद लिपारे,पांडुरंग पिसे, डी.एस.डोणे,शकील मुल्ला, महलिंग कोळेकर,रामभाऊ ठिकणे ,मनोहर जोशी,आनंद जाधव, अशोक मगदूम ,आनंदराव नागावकर आदींनी सहभाग घेतला.