प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी :
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत पंच्याहत्तर नद्यांना अमृतवाहिनी बनवण्याच्या संकल्प पूर्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ' चला नदीला जाणूया 'या उपक्रमाचे आयोजन इचलकरंजी महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या जिल्हा अमृतवाहिनी नदी संकल्प परिक्रमा संयोजन समिती यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये झाला. अध्यक्षस्थानी उपायुक्त प्रदीप ठेंगल होते. ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ विनोद बोधनकर ( पुणे ) आणि समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी ( इचलकरंजी) हे प्रमुख पाहुणे होते. स्वागत मनपाचे कामगार अधिकारी राजापुरे यांनी केले. पंचगंगा नदी संवाद परिक्रमेचे समन्वयक पर्यावरणतज्ञ संदीप चोडणकर प्रास्ताविकात म्हणाले की पूर्वी नद्या स्वच्छ आणि स्वस्थ राखण्यासाठी परिक्रमा, कुंभ केले जायचे, या गोष्टीचे महत्व आजही आहे. प्रदूषणमुक्तीसाठी, नदी अविरल-निर्मळ राखण्यासाठी नदीपरिक्रमा हा या कार्यक्रमाचा भाग असून त्यामागील भूमिका समजणे महत्वाचे आहे. नदीखोऱ्यातील समस्या आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. पंचगंगा अमृतवहिनी संकल्पसिद्धीसाठी नदीखोऱ्यातील नागरिकांना मोठया प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी मंचावर सहाय्यक आयुक्त केतन गुजर ,आरोग्य अधिकारी डॉ.सूनीलदत्त संगेवार, स्वच्छता दूत महाजन गुरुजी आदी उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
पहिल्या सत्रामध्ये' चला नदी जाणून घेऊया 'या विषयावर बोलताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले, नदी जाणून घेणे याचा अर्थ तिची अवस्था जाणून घेणे. ती अशी का व कशामुळे झाली आहे ? हे समजून घेणे. तिची आजची प्रदूषणकारी विषारी अवस्था बदलून तिला खरिखुरी अमृतवाहिनी बनवणे हा आहे. आपल्या गावातून नदी वाहते पण आपण तिचे पाणी पिऊ शकत नाही हे इथल्या आम जनतेचे मोठे दुःख आहे.काही वर्षांपूर्वी पाण्याच्या प्रदूषणामुळे काविळीची साथ येऊन चाळीसावर माणसे दगावली आणि दहा हजारावर लोक बाधित झाले .यापासून आपण जेवढा बोध घ्यायला हवा होता तो घेतला नाही. जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनीही त्यावेळी इचलकरंजीत येऊन मार्गदर्शन केले होते. पण आता पुनश्च हरी ओम म्हणत आपण पंचगंगेला अमृतवाहिनी बनण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत .ती जिथे जिथे प्रदूषित होते तिथे तिथे योग्य पद्धतीने प्रामाणिक दुरुस्ती केली पाहिजे.विकासाचे खरे इंधन पाणीच आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.प्रसाद कुलकर्णी यांनी पाणी,पाण्याचा प्रश्न,नदी स्वच्छता व आपली जबाबदारी आदिवर मार्गदर्शन केले .
दुसऱ्या सत्रामध्ये विनोद बोधनकर यांनी 'प्लास्टिक संकलन आणि पुनर्वापर 'या विषयावर स्लाईड शोच्या माध्यमातून मांडणी केली. सागरमित्र या संकल्पनेवर त्यांनी सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, वापरलेल्या प्लास्टिकचे संकलन आणि त्याचा योग्य पुनर्वापर ही लोक चळवळ बनली पाहिजे. आज प्लास्टिकच्या थरांनी केवळ आपला भूभाग, त्यावरील वने, जंगले ,दऱ्याखोरी नव्हे तर समुद्रही व्यापलेला आहे. आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजन पैकी ३० टक्के जमिनीवरील जंगलांतून येत असतो तर ७० टक्के ऑक्सिजन समुद्रातील हिरवाईतून येत असतो. तो ऑक्सिजन आता प्लास्टिकच्या कमालीच्या वेगाने कमी होत चालला आहे.हा धोका टाळण्यासाठी नव्या पिढीला खासकरून विद्यार्थी विद्यार्थिनींना त्याबाबत जागृत करण्याचे व या प्रदूषण मुक्तीत त्यांचा सहभाग घेण्याचे काम सागरमित्रद्वारे केले जाते.आज तीन देशात तीन लाख मुले त्यात सहभागी झाली आहेत. बोधनकर यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून प्लास्टिकच्या संकटाचे व त्याच्या पुनर्वापराचे प्रबोधन केले.त्यात सहभागी असलेल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती दिली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.प्रदीप ठेंगल म्हणाले, अलीकडे पाण्याचा व नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला आपण तयार नाही. काळा ओढा संस्थांनकाळात काळा नसून स्वच्छ होता. आपण जागे झालो नाहीतर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. अमृतवाहिनी संकल्प ही आता लोकचळवळ बनली पाहिजे. इचलकरंजी महानगरपालिका या नदीच्या उपक्रमात नेहमीच पुढाकार घेईल. प्लास्टिक संकलन आणि पुनर्वापराचा कार्यक्रम निश्चितपणे महानगरपालिका कृतीमध्ये उतरवेल. या वेळी परिक्रमेचा अमृतकलश आणि तिरंगा झेंडा शिक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वतीने मान्यवरांनी उपयुक्तांच्या हस्ते स्वीकारून मोहिमेतील सहभागासाठी आश्वस्त केले. यावेळी राजू नदाफ यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र घोडके सरांनी सागरमित्र कार्यक्रम त्यांच्या शाळेत राबविण्यासाठी उत्सुकता दर्शवली तसेच या उपक्रमात सहभागी होणाऱ्या काही शिक्षकांचा, स्वच्छतादूतांचा सत्कार करण्यात आला. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहामध्ये झालेल्या या समारंभाला आरोग्य खात्यात काम करणारे स्वच्छता दूत, शिक्षक वर्ग, पर्यावरण प्रेमी नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी आभार मानले.