प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.२९ ,समाजवादाचे बियाणं बरोबर आहे. पण मधल्या काळामध्ये त्या बियाणाला माओवादी ,नक्षलवादी अशी कडवट फळे लागली.आता पुन्हा तशी कडवट फळे येणार नाहीत.याची काळजी या चळवळीला घ्यावी लागेल.त्याच पद्धतीने चळवळीतील कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे विकसित होण्याचा अवकाश उपलब्ध असला पाहिजे.तसेच चळवळीला नैतिक मूल्य असले पाहिजे. ते नैतिक मूल्य चार्वाक, बुद्ध, बसवण्णा, चक्रधर, वारकरी परंपरा या साऱ्या विचारधारेतून मिळू शकते. जाती व्यवस्था आणि पुरुषप्रधान व्यवस्थेशी आपल्याला लढावे लागेल.हे सारे करत असताना केवळ शोषणमुक्त समाजनिर्मितीच नाही तर भीतीच्या छायेतून मुक्त होत जीवनातील आनंदाचा शोध घेता येणारी शाश्वती निर्माण करता आली पाहिजे.स्वातंत्र्याची संकल्पना मोकाट नव्हे तर मुक्त असते.स्वातंत्र्य हे अभंग असतं ते दुभंगलेले नसावे.कारण दुभंगलेल्या स्वातंत्र्यातून समाजिक अभंगता तयार होत नाही. ती दुभंगता दुरुस्त करावी लागेल. त्यासाठी नीतिमूल्ये अग्रस्थानी असली पाहिजेत,अशी स्पष्ट भूमिका कोबाड गांधी यांनी आपल्या पुस्तकात मांडली आहे,असे मत प्रा.डॉ.उदय नारकर यांनी व्यक्त केले.ते ' कोबाड गांधी लिखित फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकात नेमके आहे तरी काय?' या विषयावर समाजवादी प्रबोधिनीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एफ. वाय. कुंभोजकर होते.प्रारंभी प्राचार्य ए.बी.पाटील यांनी स्वागत केले.प्रा.रमेश लवटे यांनी प्रास्ताविकातून या व्याख्यानाच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली.
प्रा.डॉ.उदय नारकर म्हणाले, हिंसेच समर्थन करणारी अथवा त्याचा प्रसार ,प्रचार करणारी कोणतीच विचारधारा योग्य नसते.कोबाड गांधी यांना एका संपन्न कुटुंबाची पार्श्वभूमी आहे.तसेच ते इंग्लंड मध्ये उच्चशिक्षण घेतलेले उच्च विद्या विभूषित आहेत.जगभरच्या तरुणांना सत्तरच्या दशकात असलेले क्रांती विषयक आकर्षण होते.जगाच्या दोन तृतीयांश भागावर डावी सरकारे सत्तेवर होती.तशी शोषणमुक्त समाजव्यवस्था असली पाहिजे या भूमिकेतून आणि स्वतःला आलेल्या अनुभवातून कोबाड गांधी डाव्या व दलित चळवळीत सक्रिय सहभागी झाले.त्यांच्या उच्च विद्या विभूषित पत्नी अनुराधा यांनीही त्यांना समर्थपणे साथ दिली. त्यांच्यावर अनेक आरोप झाले. अनेक खटले दाखल झाले .पण एकही आरोप सिद्ध झाला नाही. तसेच एकाही खटल्या त्यांना शिक्षा झाली नाही हेही त्यांनी या पुस्तकात नमूद केले आहे . तुरुंगात भेटलेली राजकारणापासून गुन्हेगारी पर्यंतची पार्श्वभूमी असलेली सर्व माणसे,त्यांचे स्वभाव याचे वर्णन या पुस्तकात आहे. आपल्याला चांगले न्यायाधीश भेटले असाही त्यानी उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे व्यवस्था अन्यायी असेल तर ती प्रामाणिक व नीतीवान माणसालाही दुबळी बनवते. हेही कोबाड गांधी यांनी अधोरेखित केले आहे.
प्रा.डॉ.नारकर म्हणाले,या पुस्तका मधील चिंतन आणि औचित्य या प्रकरणातील सर्वच निष्कर्ष ,सगळेच दावे सगळ्यांना पटतील असे नाही. पण याचा अर्थ त्यांना नक्षलवादाचे समर्थक ठरवून या पुस्तकाच्या अनुवादाला जाहीर केलेला पुरस्कार परत घेणे हे चुकीचे आहे. लेखकाच्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हे विरोधात आहे. या कृतीचा निषेध म्हणून ज्या सदस्यांनी राजीनामे दिले त्यांच्या मागे आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे. आजच्या व्यवस्थेचे वाभाडे काढत नीतीमूल्यांची चर्चा करणारे आणि सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवणारे हे पुस्तक आहे. कदाचित म्हणूनच हा पुरस्कार मागे घेतला असावा.प्रा.नारकर यांनी या पुस्तकाची अतिशय नेमकेपणाने मांडणी करून त्यातील आशय उलगडून दाखवला.प्राचार्य एफ.वाय.कुंभोजकर अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले, समाजवादी समाजरचना अस्तित्वात यायची असेल तर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गोष्टी सर्वांना मिळू शकतील अशी व्यवस्था निर्माण करणे महत्त्वाचे असते. मात्र त्याऐवजी अधिकाधिक विषमता निर्माण होत असेल तर त्याबाबत शास्त्रशुद्ध पद्धतीने, चळवळीच्या मार्गाने आवाज उठवला पाहिजे याची चर्चा हे पुस्तक करते.या व्याख्यानास विविध क्षेत्रातील जिज्ञासू उपस्थित होते.