प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे मुंबई द्रुतगती मार्ग व जुना पुणे-मुंबई महामार्गावर नियमभंग करणाऱ्या वाहनांवर आजपासून चोवीस तास कारवाई केली जाणार आहे. महामार्गावर अपघात रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) चोवीस तास कारवाईसाठी 12 पथके तयार करण्यात आली आहेत.
राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी पुण्यात काही दिवसांपूर्वी सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी मुंबई-पुणे द्रतगती मार्ग व जुना पुणे-मुंबई महामार्गावर अपघात रोखण्यासाठी एक डिसेंबरपासून वाहनांची चोवीस तास तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या कारवाईसाठी नोडल एजन्सी म्हणून पुणे व पनवेल आरटीओ काम करत आहेत. या उपक्रमासाठी मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी-चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांमधून 12 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये 30 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी सहा पथके चोवीस तास रस्त्यांवर तैनात राहणार आहेत. प्रत्येक पथकात तीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. तपासणीसाठी महामार्ग पोलीस, आरटीओ आणि आयआरबी यांची देखील मदत घेतली जाणार आहे.