पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्‍वासन दिल्यानंतर रात्री उशिरा बेमुदत मागे घेण्यात आला

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  शहरातील बाईक-टॅक्‍सी सेवा पूर्णपणे बंद करावी, रिक्षा परमिट बंद करावे, अशा विविध मागण्यांसाठी रिक्षा संघटनांनी पुणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयासमोर सोमवारी चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर रात्री उशिरा बेमुदत बंद स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी सांगितले.

सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून रिक्षाचालकांनी संपाला सुरुवात केली. पुण्यातील महत्वाच्या 12 रिक्षा संघटनांनी या संपात सहभाग घेतला होता. 10 वाजल्यानंतर 12 रिक्षा संघटनांचे रिक्षाचालक आरटीओ कार्यालय परिसरात जमायला सुरुवात झाली.

बघता-बघता हजारोंच्या संख्येने रिक्षाचालक येथे हजर झाले. यावेळी विविध रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी भाषणे करून बेकायदा बाईक टॅक्‍सी बंद झालीच पाहिजे तसेच आरटीओ विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. त्यांच्या घोषणांनी आरटीओ कार्यालयासमोरील परिसर दुमदूमून गेला होता. रिक्षाचालकांकडून आरटीओ कार्यालय परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शहरात सोमवारी रिक्षा संघटनांनी आरटीओ कार्यालयसमोर ठिय्या आंदोलन करून बेमुदत बंद सुरू केल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. काही ठिकाणी प्रवाशांकडून जास्तीचे भाडे आकारणे, रिक्षा फोडणे, रॅपिडो चालकांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे या बंदचा सर्वाधिक मनस्ताप नागरिकांनाच सहन करावा लागला आहे.

रिक्षा बंदचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि रुग्णांना बसला. विद्यार्थ्यांनी रिक्षा बंद असल्यामुळे पीएमपी बसचा आधार घेतला; पण सकाळी पीएमपी बसमध्ये गर्दी असल्यामुळे लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. 

Post a Comment

Previous Post Next Post