शासन निर्णयानुसार निविदा शुल्क घ्यावे : आम आदमी पार्टीची मागणी..
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे मनपा निविदा प्रक्रियेत सहभागासाठी लागणारे अवाजवी, शासन निर्देशाकडे दुर्लक्ष करून आकारण्यात येत असलेले निविदा शुल्क कमी करणे बाबत आज आदमी पार्टीतर्फे आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले. आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, बिबवेवाडी विभाग प्रमुख घनश्याम मारणे व अमोल मोरे यांनी ही मागणी केली. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली असता वाढीव निविदा शुल्क पुणे मनपाच्या तिजोरीत जमा होत नसल्याने त्याचा मनपाला कोणताही लाभ होत नसल्याने लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
पुणे महानगर पालिका आपल्या विविध विकास कामांच्या हजारो निविदा प्रसिद्ध करते. त्यात हजारो सर्वसामान्य ठेकेदार, अनेक सुशिक्षित बेरोजगार अभियंता ह्यात सहभाग घेतात. ह्यासाठी लागणारे तसेच परत न मिळणारे निविदा खरेदी शुल्क प्रचंड आहे.
शासनाने दिलेल्या निर्देशाच्या कितीतरी पटीने ते अधिक आहे.
(शासन अध्यादेश क्रमांक CAT/ 2017/ प्र. क्र. 08/इमा -2 दि. 27/09/2018 पृष्ठ क्रमांक 25 )
उदा. जिथे शासनाने रु. 2000/- सांगितली आहे तिने रु. 11,979/- ची आकारणी होत आहे. सदर प्रकार का, कशासाठी, कुणाच्या फायदयासाठी होत आहे, त्यावर कोणाचेच कसलेच बंधन का नाही? असे अनेक प्रश्न या निमित्ताने आम आदमी पार्टीने उपस्थित केले आहेत.
तरी सदर प्रकरणी त्वरित चौकशी करून सोबत जोडलेल्या शासन निर्देशानुसार निविदेचे शुल्क ठेवण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी आपने केली.