प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कर्तव्यात कसूर केल्यामुळे केलेल्या बदली विरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात दाद (मॅट) मागण्याचे प्रकरण पोलिस निरीक्षकाला चांगलेच भोवले. बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होता, थेट न्यायाधिकरणाकडे धाव घेत शिस्तीचा भंग केल्यामुळे न्यायाधिकरणानेच संबंधित पोलिस निरीक्षकावर शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले.
त्याची दखल घेत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधित पोलिस निरीक्षकास निलंबित केले आहे.रवींद्र मानसिंग कदम असे निलंबन केलेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. कदम हे चंदननगर ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. तेथे कर्तव्यकसुरी केल्यामुळे त्यांची चंदननगर ठाण्याहून थेट दंगा काबू पथकामध्ये बदली केली होती. त्याविरुद्ध कदम यांनी 'मॅट'मध्ये दाद मागितली होती. कदम यांनी सादर केलेला अर्ज 'मॅट'ने बुधवारी रद्द करीत त्यांच्याकडून झालेल्या बेशिस्त वर्तनाबाबत ताशेरे ओढले होते. तसेच कदम यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले होते.
कदम यांनी अशोभनीय वर्तन करीत शिस्तबद्ध पोलिस खात्याची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता. त्यानुसार, त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिस (शिक्षा व अपील) नियम १५६ मधील तरतुदी व मुंबई पोलिस अधिनियमानुसार, त्यांच्याविरुद्ध खात्याअंतर्गत झालेल्या प्राथमिक व विभागीय चौकशी अहवालानुसार, निलंबित करण्यात आले असल्याचा आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला. त्यानुसार, कदम यांचे निलंबन केले आहे.
रवींद्र कदम यांची बदली झाल्यानंतर ते मॅटमध्ये गेले होते. मात्र त्यांनी नियमानुसार, बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होता, थेट न्यायाधिकरणात गेले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत 'मॅट'ने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
-डॉ. जालिंदर सुपेकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन)