अजून ३८ महिलांची भारतात परतण्याची प्रक्रिया सुरू: आप राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार
आखाती देशात जाणाऱ्या घर कामगार महिलांची फसवणूक रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार : आम आदमी पार्टी
प्रेस मीडिया लाईव्ह :
आम आदमी पार्टीच्या प्रयत्नामुळे ओमान देशात अडकलेल्या पुणेकर पुजा कसबे यांच्यासह ४२ घरेलू कामगार महिला भारतात परतल्या असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच अजून ३८ घरकामगार महिलांची भारतात येण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. आखाती देशात जाणाऱ्या घर कामगार महिलांची फसवणूक रोखण्यासाठी आम आदमी पार्टी विशेष प्रयत्न करणार असल्याचे देखील विजय कुंभार यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला *विजय कुंभार यांच्यासोबत आपचे डॉ अभिजीत मोरे, अब्बास खान , निरंजन अडागळे, पूजा कसबे, श्रद्धा गायकवाड यांनी संबोधित केले.
टुरिस्ट अथवा व्हीजिट व्हिसावर आखाती देशांमध्ये गेलेले भारतीय हे पुन्हा वेळेत परतले असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी ही संबंधित भारतीय दूतावासावर आहे. अनेकदा त्याच्यामध्ये कुचराई करण्यात येत असल्याची बाब आम आदमी पक्षाच्या निदर्शनास आली आहे. याबाबत आम आदमी पक्ष आवाज उठवणार आहे.
भारतातील एजंटच्या भूलथापांना बळी पडत पुण्यातील *पूजा नितीन कसबे* या मोठ्या पगाराच्या प्रलोभनाने (महिना ४० हजार रुपये वेतन) ओमान देशात घरकाम करण्यासाठी जुलै २०२२ मध्ये गेल्या. मात्र तिथे गेल्यावर त्यांना त्यांची एजंटने फसवणूक केल्याचे लक्षात आले. महिना ४० हजार रुपयांऐवजी केवळ १०० रियाल म्हणजे सुमारे २०-२१ हजार रुपये प्रति महिना एवढेच वेतन कराराद्वारे ठरल्याची बाब तिथल्या मालकांनी पूजा कसबे यांना सांगितले. या वीस हजार रुपयांच्या बदल्यामध्ये त्यांना कोणतीही विश्रांती अथवा सुट्टीशिवाय दररोज पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत काम करण्यासाठी दबाव टाकला गेला. त्यांची पिळवणूक करण्यात आली. त्यांचा पासपोर्ट मालकाने जप्त केला. मोठ्या मुश्किलीने ऑगस्ट महिन्यात त्या तेथील मालकाच्या बंगल्यातून पळून भारतीय दूतावासाच्या मस्कत शहरातील एका शेल्टरमध्ये पोहचल्या. या शेल्टरमध्ये त्या तब्बल तीन महिन्याहून अधिक काळ अडकून पडल्या होत्या. या शेल्टरमध्ये सुमारे ८० फसवणूक झालेल्या घरकामगार महिला अडकून पडल्या होत्या. त्यातील काही महिला तर एक- दीड वर्षाहून जास्त काळ अडकल्या होत्या.
ओमान मधील ज्यांच्या बंगल्यामध्ये पूजा कसबे काम करत होत्या ती तेथील एक प्रभावशाली व्यक्ती होती आणि भारतातून घर कामगार महिला ओमानमध्ये आणण्यासाठी त्यांनी खर्च केलेले १००० रियाल म्हणजे सुमारे २,००,००० रुपये ते २,२५,००० रुपये परत केल्यानंतरच त्यांना भारतात जाता येऊ शकेल असे त्यांनी सांगितल्याने पूजा कसबे यांची मोठी पंचाईत झाली होती. अशा वेळी भारतीय दूतावासातून देखील म्हणावी तशी मदत होत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये पूजा कसबे यांचे पुण्यातील कुटुंबीय हे चिंतित झाले होते. *पूजा कसबे यांच्या वहिनी श्रद्धा गायकवाड यांनी आम आदमी पक्षाच्या निरंजन आडागळे व डॉ अभिजीत मोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विजय कुंभार यांच्याशी याबाबत चर्चा केली. विजय कुंभार यांनी अब्बास खान यांच्या मदतीने ओमान मधील काही प्रभावशाली भारतीय उद्योजकांशी संपर्क साधून त्यांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी ओमान मधील पूजा कसबे यांना नोकरी देणाऱ्या मालकाशी प्रत्यक्ष चर्चा केली. तसेच मस्कत येथील भारतीय दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भारतीय घरेलू कामगार महिलांची ओमानमध्ये झालेली फसवणूक आणि शेल्टरमध्ये अडकलेल्या घर कामगार महिलांच्या अडचणी याबाबत चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याची विनंती केली. या उद्योजकांनी ओमान देशातील स्थानिक राजकीय नेते, अधिकारी यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. परिणामी फलस्वरूप म्हणून केवळ पूजा कसबेच नव्हे तर भारतीय दुतावासाच्या मस्कत येथील शेल्टरमध्ये अडकून पडलेल्या ८० पैकी तब्बल ४२ घरेलू कामगार महिला या महिन्यामध्ये भारतात परतल्या आहेत. अजून ३८ घरेलू कामगार महिलांना भारतामध्ये परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सोमवारी पूजा कसबे या पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी *मंगळवारी आम आदमी पक्षाच्या नाना पेठ येथील कार्यालयाला कुटुंबीयांसहित भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. आम आदमी पक्षाच्या प्रयत्नामुळेच आपण आपल्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पोहोचल्याची बाब त्यांनी या भेटीमध्ये बोलून दाखवली*. यावेळी त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी पूजा कसबे यांनी ओमान मधील भारतीय उद्योजकांशी फोनवर बोलून त्यांचेही आभार मानले.
आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतातून घरकामगार महिला या अवैध पद्धतीने टुरिस्ट/ व्हीजिट व्हिजावर पाठवल्या जातात आणि नंतर त्यांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक, आर्थिक पिळवणूक करण्यात येते. घरकाम महिलांची होणारी ही फसवणूक टाळण्यासाठी येत्या काळामध्ये आम आदमी पार्टी विशेष प्रयत्न करणार असल्याची बाब देखील यावेळी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आली.
कळावे,
डॉ अभिजीत मोरे,
आप पुणे शहर मिडिया टीम