प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पावसाळ्यात खराब झालेल्या सर्वच रस्त्यांची दुरुस्ती महानगरपालिकेच्या मुख्य खात्याकडूनच केली जाणार आहेत.पुणे शहरात एकूण 1400 किलोमीटरचे रस्ते असून, त्यातील 12 मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांचे काम मुख्य खाते करते तर क्षेत्रीय कार्यालयाकडून त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची कामे केली जातात.मात्र क्षेत्रीय कार्यालय स्तरावर होणारा निविदांचा गोंधळ, कामाचा निकृष्ट दर्जा तसेच प्रत्येक कामासाठी स्वतंत्र निविदा काढव्या लागणार असल्याने या कामांना विलंब होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पथ विभागाकडून देण्यात आली आहे .
महानगरपालिकेकडून दरवर्षी शहरात पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे दुरुस्ती, रिसर्फेसिंग तसेच पूर्ण रस्ता नव्याने डांबरीकरण करण्यासाठी वर्षाला जेमतेम 100 ते 125 कोटींचा खर्च केला जातो. मात्र, यावर्षी शहरात खराब झालेले सर्वच रस्ते सरसकट दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जवळपास 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील 180 कोटी रुपयांच्या निविदा या पूर्वीच प्रशासनाने जाहीर केल्या असून, पुढील काही दिवसांत त्या उघडल्या जाणार आहेत. मात्र, त्यातच जानेवारी महिन्यात शहरात जी-20 परिषद होणार असल्याने महापालिकेने लगेच आणखी 38 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी 142 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्य खात्याकडील 30 किलोमीटरच्या 34 रस्त्यांचा समावेश आहे. तर क्षेत्रीय कार्यालयांचे 15 किलोमीटरचे रस्ते असून, त्याचा खर्च जवळपास 16 कोटींचा असून, त्यात 21 रस्त्यांचा समावेश आहे.