प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महानगरपालिकेच्या निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून कोंढव्यात हॉस्पिटल व भाजी मार्केट बांधण्यात आले. मोठा गाजावाजा करीत उद्घाटन पण झाले. परंतु, हे प्रकल्प सामान्यांसाठी खुले करण्यात आले नाहीत, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोफत भाजी वाटप, रस्त्यावरच प्रतिकात्मक उपचार करीत निषेध आंदोलन करण्यात आले. खदीजा प्रसूतीगृह दवाखाना, हजरत अब्दुल रहमान ओटा मार्केट पालिकेच्या निधीतून बांधण्यात आलेल्या या दोन्ही प्रकल्पाचे उद्घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. परंतु, हे प्रकल्प बंद असल्याने शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार शिवसेनेचे नेते महादेव बाबर यांनी केले.
यावेळी उपस्थित नागरिकांना मोफत भाजीचे वाटप तसेच प्रतिकात्मक डॉक्टर व रुग्ण बनवून रस्त्यावरच उपचार करण्यात आले. भाजी बाजार आणि हॉस्पिटल दोन महिन्यांत सुरू करावेत अन्यथा महापालिकेत आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही महादेव बाबर यांनी दिला.