पोलिसांना गोवा बनावटीच्या मद्याचे १४ लाख १ हजार ७२० रूपये किंमतीचे ३९४ बॉक्स मिळाले.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : औषधांसाठी लागणा-या केमिकलची वाहतूक करीत असल्याचे भासवत गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणारा ट्रक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडला.
१४ लाखांचे मद्य आणि ट्रक असा सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी टोल नाक्यावर आज, मंगळवारी (दि. १५) दुपारी ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली. इब्राहीम हकीम खान (वय २२) आणि सत्तार मिठा खान (२७, रा. आत्मज अगडवा, जि. जालोर, राजस्थान) अशी या दोघांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, गोवा बनावटीचे मद्य घेऊन एक ट्रक पुण्याच्या दिशेने जाणार असल्याची माहिती एलसीबीचे हावलदार सुरेश पाटील आणि आसिफ कलायगार यांना मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक संजय गोर्ले यांच्यासह विनायक सपाटे आणि त्यांच्या पथकाने पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ सापळा रचला.
संशयित ट्रक चालक इब्राहीम खान आणि सत्तार खान यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी केमिकलचे बॉक्स असल्याचे सांगितले. मात्र केमिकलच्या बिलांबद्दल विचारणा केल्यानंतर त्यांचा गोंधळ उडाला. ट्रकची तपासणी केल्यानंतर पोलिसांना गोवा बनावटीच्या मद्याचे १४ लाख १ हजार ७२० रूपये किंमतीचे ३९४ बॉक्स मिळाले.