प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद दि 23 (अब्दुल कय्यूम ) :
शासनाच्यावतीने देशभर नागरिकांच्या आधारकार्ड नोंदणीची मोहिम मोठया प्रमाणावर राबविण्यात आली. आज रोजी बहुतांश नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात आले.शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार दहा वर्षानी आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हयातील ज्या नागरिकांचा आधार नोंदणी करुन दहा वर्ष इतका कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांनी आपले आधारकार्ड अपडेट करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.
आधारकार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक नोंदीचे अद्यावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी दहा वर्षांनी आधार ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना आधारकार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यांनी आपल्या नजीकच्या आधार केंद्रावर जाऊन केवायसी करुन घेणे आवश्यक आहे.
शासनाच्या ९ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या राजपत्रान्वये १८ वर्षावरील नागरीकांनी आपले आधारकार्ड काढले नसल्यास व १८ वर्षांनंतर पहिल्यांदाच आधार नोंदणी करीत असल्यास अशा नागरिकांच्या कागदपत्राची यापुढे जिल्हा स्तरीय आधार समिती मार्फत तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत आधारकार्ड का काढल्या गेले नाही याची तपासणी या समितीकडे सदर नागरिकांचे कागदपत्र ऑनलाईन सादर झाल्यानंतर केली जातील. त्यामुळे ज्यांनी अद्याप आधारकार्ड काढलेले नाही त्यांनी कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करावे व ज्यांनी आधारकार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यांनी आपले आधारकार्ड ईके- वायसी अपडेट करुन घ्यावे. आधार अपडेट न केल्यास भविष्यात आधार नोंदणी स्थगित होण्याची शक्यता आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या आधार विनियमन २०१६ मधील नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा आधार नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. २२ .११.२२ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये अक्षया यादवा डायरेक्टर आधार कार्यालय मुंबई तसेच अभिषेक पांडे मॅनेजर आधार कार्यालय मुंबई यांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले सदर मीटिंगमध्ये जिल्हा नोडल ऑफिसर तथा उपजिल्हाधिकारी निवडणूक तसे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक महाआयटी ,इंडिया पोस्ट ,बँक एज्युकेशन ,हेल्थ या सर्व डिपार्टमेंटचे प्रमुख सदर बैठकीत उपस्थित होते.