प्रेस मीडिया लाईव्ह :
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.राणा यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेलं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचं मुंबई हायकोर्टात वर्षभरापूर्वी सिद्ध झालं होतं. शिवाय हायकोर्टाने नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.त्यानंतर राणा यांनी हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. या प्रकरणावर २२ जून २०२१ रोजी अंतरिम आदेश देताना मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती देत नवनीत राणा यांना एकप्रकारे दिलासा दिला होता. गेले अनेक दिवस हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे.
गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्रात बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर माजी खासदार अडसूळ हे शिवसेना सोडून शिंदे गटात सामिल झाले आहेत. २०१९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्याने लोकसभा निवडणूक जिंकलेल्या नवनीत राणा या भाजपच्या गोटात सामील झाल्या आहेत. शिवाय शिंदे गटाने भाजपसोबत एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत याचिकाकर्ते आनंद अडसूळ आणि नवनीत राणा यांचा राजकीय गट एकच झाला आहे.
अमरावती लोकसभेची सीट ही अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव असते. निवडणुकीच्या वेळी राणा यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राविरोधात शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंद अडसूळ आणि सुनील भालेराव या दोघांनी २०१७ साली कोर्टात याचिका दाखल केली होती. नवनीत राणा यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेलं मोची जातीचं प्रमाणपत्र हे बोगस असल्याचा आरोप अडसूळ आणि भालेराव यांनी केला होता.