प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :
दिवाळीच्या निमित्तानं आवश्यक असलेल्या चार महत्त्वाच्या जिन्नस अवघ्या १०० रुपयांत रेशनवर उपलब्ध करून देण्याचा सरकारनं घेतला आहे. रेशनकार्ड धारकांना शंभर रुपयात रवा, साखर, चणाडाळ, तेल या चार वस्तू मिळणार आहे. या निर्णयामुळे गरिबांची दिवाळी गोड होईल अशी अपेक्षा होती. परंतु दोन दिवसांवर दिवाळी आली असताना सुद्धा या वस्तू शिधाधारकांना उपलब्ध होत नसल्याने पनवेल पालिकेचे मा.विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी नाराजी व्यक्त केली आहे. त्यासोबतच त्यांनी पुढील दोन दिवसात यासंदर्भात युद्ध पातळीवर निर्णय घेऊन शिधावाटप केंद्रामध्ये वरील वस्तू उपलब्ध कराव्यात आणि त्याचे नियोजन योग्य पद्धतीने करावे अशी विनंती त्यांनी तहसीलदार पनवेल- उरण यांना केली आहे.
महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दिवाळीचा गोडवा वाढवण्यासाठी करंजी, चकली, लाडू, शंकरपाळे हे पदार्थ तयार केले जातात. पण हे पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने गरिबांना यंदाच्या दिवाळीत रेशन दुकानातून चार फराळासाठी आवश्यक वस्तू शंभर रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रवा, साखर, चणाडाळ आणि तेल मिळणार असून तालुक्यातील रेशन दुकानांतून या वस्तूंचे वितरण होणार आहे. अशा प्रकारची जाहिरात संपूर्ण तालुक्यामध्ये करण्यात आली. परंतु 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत एकाही शिधावाटप केंद्रावर सदरच्या वस्तू उपलब्ध नव्हत्या अशा तक्रारी नागरिकांच्या माध्यमातून पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्याकडे आलेल्या होत्या. त्या संदर्भात त्यांनी तहसील कार्यालयांमध्ये संबंधित विषयात पाठपुरावा केला.
दिवाळी हा सण संपूर्ण भारतात उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यामध्ये गरिबांपासून ते उच्चभृ लोकांपर्यंत सर्वजण साजरे करतात. यावर्षी शासनामार्फत घेण्यात आलेला हा उपक्रम खूप चांगला आहे पुढील दोन दिवसात पनवेलचे- उरण चे तहसीलदार यांनी यासंदर्भात युद्ध पातळीवर निर्णय घेऊन शिधावाटप केंद्रामध्ये वरील वस्तू उपलब्ध कराव्यात आणि त्याचे नियोजन योग्य पद्धतीने करावे असे आवाहन प्रितम जनार्दन म्हात्रे मा. विरोधी पक्ष नेता, पनवेल महानगरपालिका यांनी केले आहे.
कोट
महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना महाराष्ट्र शासनाकडून या चांगल्या उपक्रमाचे नियोजन व्यवस्थित करणे अपेक्षित आहे. यासंदर्भात पनवेलचे तहसीलदार यांनी सांगितले की आम्हाला काही वस्तू अजून येणे बाकी आहे त्या आल्या की येत्या शुक्रवार पर्यंत सर्व केंद्रांवर वस्तू आम्ही उपलब्ध करून देऊ. तसेच उरणचे तहसीलदार यांच्याशी चर्चा केली असता त्यांच्याकडूनही शनिवार पर्यंत सर्व केंद्रांवर आवश्यक त्या वस्तू शासनाकडून मिळाल्यावर आम्ही ताबडतोब नागरिकांसाठी वस्तू उपलब्ध करून देऊ असे सांगण्यात आले :- प्रितम जनार्दन म्हात्रे, मा. विरोधी पक्षनेते ,पनवेल महानगरपालिका