' इंद्रधनुष्य ' दिवाळी अंकाचे प्रकाशन



प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ ता. १७, दिवाळी अंकाची शतकोत्तर वर्षांची  परंपरा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. दिवाळी अंकामुळे अनेक साहित्यिकांना, नवोदित लेखकांना, कवींना व्यक्त होण्याचे माध्यम मिळते. साहित्य व्यवहाराच्या दृष्टीने हे निश्चितच महत्वाचे आहे. समाजाला नवी दिशा आणि नव समाज निर्मितीसाठी साहित्याची गरज आहे. ही गरज ओळखून 'इंद्रधनुष्य' मासिकाने ही परंपरा टिकवण्याचे काम केले आहे. समाजाला काय हवे आहे ते उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी नेमके जाणले आहे. सामाजिक बांधिलकीचा डंका सर्वजण पिटतात, मात्र बांधिलकी बरोबर आता सामीलकी महत्त्वाची आहे. तरच हा समाज जीवनाचा रथ पुढे जाणार आहे. त्या दृष्टीने साहित्य व सांस्कृतिक जगरणाचे काम ' इंद्रधनुष्य ' करते असे प्रतिपादन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस व ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी केले. मासिक 'इंद्रधनुष्य ' च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील होते.


प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, मानवी मेंदूचे सकस वैचारिक भरणपोषण  झाल्याखेरीज सुदृढ समाज निर्मिती होणार नाही. त्यासाठी सकस साहित्य निर्माण होणे व ते वाचले जाणे करणे गरजेचे आहे. समाजाला नवे विचार देण्याचे काम साहित्यिक करत असतो. त्याच्या द्रष्ट्या विचारातून समाज वृद्धिंगत होत पुढे जात असतो. त्यामुळे साहित्यिकांवरील जबाबदारी  नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे. समकालीन परिस्थितीत ती अधिक टोकदारपणे पार पाडली जाण्याची गरज आहे.

         अध्यक्षीय भाषणात उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, सहकार महर्षी, स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी जे वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले आहे ती शिदोरी घेऊन आम्ही वाटचाल करीत आहोत. मासिक इंद्रधनुष्य मधून वेगवेगळ्या विषयांचे साहित्य वाचकांच्या समोर ठेवून जनजागृती आणि प्रबोधन करण्याचा आमचा मानस कायम राहणार आहे. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी दत्त उद्योग समूह या परिसरात आपले योगदान कायम देत राहील.

यावेळी प्रा. अशोक दास, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, प्रकाश देसाई सर, राजेंद्र प्रधान, इकबाल इनामदार यांनीही मासिक इंद्रधनुष्यचे कौतुक केले.

प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक कार्यकारी संपादक प्रा. मोहन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सहसंपादक संजय सुतार यांनी केले. आभार नीलम माणगावे यांनी मानले. यावेळी सामाजिक, साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post