प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगोला : पंढरपूरला कार्तिकी यात्रेसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत चारचाकी गाडी घुसल्याने भीषण अपघात झाला. सोमवारी संध्याकाळी सांगोला तालुक्यातील जुनोनी बायपास जवळ झालेल्या या अपघातात ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत.जखमींवर सांगोला येथे उपचार सुरु आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथून ही दिंडी निघाली होती.
दरम्यान, मृतांमध्ये पाच महिला, एक पुरूष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. शारदा आनंदा घोडके (40), सुशीला पवार, सुनिता सुभाष काटे (55), शांताबाई जयसिंग जाधव (55), रंजना बळवंत जाधव (50), सर्जेराव श्रीपती जाधव (45), गौरव पवार (सर्वजण रा. जठारवाडी ता करवीर जि.कोल्हापूर) अशी मृत वारकऱ्यांची नाव आहेत.
तर अनिता गोपीनाथ जगदाळे (60), अनिता सरदार जाधव (55), सरिता अरुण सियेकर (45), शानुताई विलास सियेकर (35) सुभाष केशव काटे (67) अशी जखमींची नाव आहेत. याशिवाय गाडीचालक तुकाराम दामु काशिद (रा.सोनद ता. सांगोला) आणि दिग्विजय मानसिंग सरदार (रा.पंढरपुर ता.पंढरपूर) हे दोघेही जखमी आहेत.
मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा :
वारकऱ्यांच्या या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.