कर्मचाऱ्यास आपले फास्टॅग खाते बॅकेंतून ब्लॉक करावे लागले
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करत असलेल्या महापालिका कर्मचाऱ्याची गाडी घरीच असताना या कर्मचाऱ्याची गाडीच्या फास्टॅग मधून सोलापूर रस्त्यावरील तीन टोल नाक्यांच्या टोलची रक्कम कापली गेली त्यामुळे या कर्मचाऱ्यास आपले फास्टॅग खाते बॅकेंतून ब्लॉक करावे लागले आहे.
या कर्मचाऱ्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार करत हा प्रकार गंभीर असून हा ऑनलाइन फ्रॉड असल्याची भीती व्यक्त करत, अशा प्रकारे आणखी कोणाचे नुकसान होऊ नये, यासाठी या प्रकरणी तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. मनपा आरोग्य विभागातील सुरेश परदेशी यांच्यासोबत हा प्रकार घडला. दरम्यान, या प्रकाराबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, होत होऊ शकला नाही.
परदेशी यांच्याकडे एमएच 12 जेए 0717 या क्रमांकाची ऍम्बेसेडर कार आहे. ती घराशेजारीच उभी आहे. त्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रमधून 5 ऑगस्ट 2021 रोजी फास्टॅग खरेदी केला होता. त्यात 500 रुपये बॅलन्स होता. हा फास्टॅग घेतल्यानंतर त्यांची गाडी कधीही बाहेर गेलेली नव्हती. 27 ऑक्टोबर रोजी परदेशी नेहमीप्रमाणे साडेनऊ वाजता कार्यालयात गेले. त्यानंतर 10 वाजून 04 मिनिटांनी त्यांना मोबाइलवर पाटस टोल नाक्यावर त्यांच्या गाडीच्या फास्टॅग मधून 85 रुपये कपात झाल्याचा मेसेज आला.त्यामुळे गाडी घरीच असताना पैसे कसे गेले? असा प्रश्न परदेशी यांना पडला, त्यांनी तातडीनं घरी पत्नीला फोन करून गाडी कोणी सोलापूरकडे घेऊन गेले आहे का, अशी विचारणा केली. त्यानंतर पत्नीला घराबाहेर जाऊन गाडी चोरी झाली नाही हे पाहण्यास सांगितले. पण, गाडी घरीच होती. दरम्यान, 11 वाजून 49 मिनिटांनी परदेशी यांच्या खात्यातून सरडेवाडी येथील टोलमधून 85 रुपये, तर 12 वाजून 18 मिनिटांनी वरवडे टोल नाक्यावर 70 रुपये कापले गेले. त्यामुळे पुढील पैसे कट होण्याआधीच परदेशी यांनी बॅंकेशी संपर्क साधून आपले फास्टॅग खाते ब्लॉक केले.
या प्रकारामुळे खूप मनस्ताप झाला. गाडी आणि फास्टॅग घरीच असताना पैसे कट झाल्याने मी बॅंक तसेच इतर काही ठिकाणी संपर्क साधला. मात्र, पैसे कपात सुरूच होते. आता तातडीने खाते ब्लॉक करून घेतले. मात्र, हा कदाचित ऑनलाइन फ्रॉड असून त्याचा अनेकांना फटका बसू शकतो. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाची संपर्क साधून तातडीनं असे प्रकार थांबविण्याची विनंती केली आहे.
– सुरेश परदेशी, महापालिका कर्मचारी