वर उपाययोजना कधी..? कोण करणार? कशी करणार..?
प्रेस मीडिया लाईव्ह :
अनवर अली शेख :
पुणे : वाढती लोकसंख्या आणि त्यापेक्षाही वेगाने वाढणारी वाहनसंख्या या पुण्याच्या समस्यांत दिवसें दिवस भर घालत आहेत. त्यामुळे शहर किंवा उपनगरांत कोठेही गेलो, तरी वाहतूक कोंडीची समस्या तीव्र-भयंकर झाली आहे.या वर उपाययोजना कधी..? कोण करणार? कशी करणार..? असे मुलभूत प्रश्न समस्त पुणेकरांचे आहेत. गणेशोत्सवानंतर ही समस्या उग्र झाली आहे. याबाबत नेते-मंत्री जाऊ द्या, पण किमान पोलीस आणि महनगरपालिकेने तरी नियोजन करावे, अशी मागणी होणे साहजिकच आहे.
चारचाकी वाहनांवर मर्यादा आवश्यक
शहरात अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे, आलिशान आणि मोठमोठी चारचाकी वाहने. गरज नसेल तेथेही ही मंडळी ऐटीत वाहन नेतात. एका भल्यामोठ्या कारमध्ये एक-दोन व्यक्तीच असतात. पण, आपल्यामुळे रस्ता-जागा-पार्किंग अडवले जातेय याची जाणीव त्यांच्यालेखी कोठेही नसते. कारण, त्यांनी रोड टॅक्स भरलेला असतो पण, किमान सण-उत्सवांच्या काळात संभाव्य गर्दी पाहता अशा वाहन चालकांनी तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. ही कोंडी रोखण्यासाठी ऑड-ईव्हन, स्वतंत्र लेन, कार्यालयांच्या वेळांत बदल यांसारखे पर्याय पडताळून पाहणे आवश्यक आहे.
बेशिस्तांचे लोंढे
शहरात मंत्र्यांचे दौरे, त्यात मुसळधार पाऊस यामुळे पुणेकरांची कोंडी होत आहे. विविध कारणांनी नागरिक घराबाहेर पडतात अन् कोंडीत अडकतात. मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत रस्त्यांचा श्वासही यामुळे गुदमरतो आहे.आता मागच्या दोन दिवसांत दिवाळीनिमित्त घराबाहेर पडलेले लोक आणि वाहतुकीचे चित्र पाहता, पुण्याची शिस्तप्रियता हरवली आहे याची जाणीव पदोपदी होतेय. पाहावे तिकडे अस्ताव्यस्त, बेशिस्त आणि बेभान वाहनचालक दिसतात. त्यातही चारचाकी वाहनांच्या संख्येने या बेशिस्तीत भर घातली आहे.
नागरिकांनो, तुमचीही कर्तव्ये आहेत
बेशिस्तपणा बाजूला ठेवून वाहतुकीच्या नियमांचे पालन करायलाच पाहिजे.
नो-एन्ट्रीतून वाहने नेऊ नयेत
पार्किंग सुविधा असलेल्या ठिकाणीच किंवा वाहतुकीला अडथळा न होणाऱ्या ठिकाणी वाहने उभी करा
वादापेक्षा सामंजस्याने मार्ग काढण्यासाठी सहकार्य करावे
महापालिकेनेही आवश्यक तेथे रस्ते रुंदीकरण करण्याची गरज आहे.
महापालिका, पोलीस, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना, नागरिक या सर्वांनीच पुढाकार घेण्याचीच गरज आहे
पावत्या नंतर फाडा, आधी नियोजन करा
एकट्या पुणे शहराची लोकसंख्या 50 लाखांच्या घरात आहे. तर, शहरात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांची संख्याही 35 लाखांवर गेली आहे. वाहने वाढली असली, तरी तुलनेत रस्ते रुंदीकरणालाही मर्यादा आहेत. शिवाय, अडथळेही निर्माण होतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याबाबत जनजागृती होत असली, तरी तुलनेत पीएमपीसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही कोलमडलेली असते. सक्षमपणे ही व्यवस्था नसल्याने बहुसंख्य नागरिक स्वत:ची वाहने वापरतात. अशा वेळी पावत्या फाडण्यापेक्षा वाहतूक नियमनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
वाहतूक पोलिसांचे कर्तव्य काय, हे स्पष्ट करा
वाहतूक पोलीस मुख्य चौकांमध्ये टोळीप्रमाणे उभे असतात. काही तरी कारण शोधून नियमांचा धाक दाखवत दंड लावतच असतात. शिवाय, तो वसूलही केला जाते. तर, नो-पार्किंग क्षेत्रात उभ्या केलेल्या वाहनांवर टोइंगची कारवाई केली जाते. यावरुन बऱ्याचदा वाहनचालक व पोलीस यांच्यात हमरीतुमरी होते. महसूल जमा करण्याबाबतचे
“टार्गेट’ पूर्ण करताना पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेकडे थोडे लक्ष द्यावे, ही माफक अपेक्षा पुणेकरांची आहे. वाहतूक सुरळीतपणे चालावी याकडे कोणीही का लक्ष पुरवत नाही, हे सामान्य पुणेकरांना न सुटणारे कोडे झाले आहे.